सतेज पाटलांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ (Photo - X)
Gokul Politics : राज्याच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाचा विषय चांगलाच तापला आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलने गोकुळ निवडणुकीत बाजी मारत २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून १२ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे, संचालक निवडीचा पेच आणखीनच वाढला. त्यातच आता राज्य सरकारने ५ स्वीकृत संचालकांची नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
गोकुळच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावं लागलं. आकड्यांचं गणित पाहता सतेज पाटील गटाचं पारडं जड दिसत होतं. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ सदस्यांचा कोरम पूर्ण न झाल्याने निवडीचा कार्यक्रम रखडला.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीच्या १२ संचालकांना सहलीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. सुरुवातीला हे संचालक अलिबागमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र, सतेज पाटील यांनी वेगळीच माहिती समोर आणली.
NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी महायुतीचे संचालक गोवा, सूरत असा प्रवास करत उदयपूरला पोहोचल्याचा दावा केला. हे सर्व संचालक उदयपूरमधील मॅरिएट हॉटेलमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं. एवढंच नाही, तर प्रत्येकाच्या रूम नंबरचीही आपल्याला माहिती असल्याचं सतेज पाटील म्हणाले. पहिल्या मजल्यावर १३० पासून रूम नंबर असल्याचा दावा करत त्यांनी राजकीय चर्चेला आणखी हवा दिली.
एकीकडे अध्यक्षपदाचा पेच कायम असतानाच राज्य सरकारने ५ स्वीकृत संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने वादाला नवं वळण मिळालं आहे. या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेचं गणित बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सतेज पाटील यांनी या निर्णयावर आक्षेप घेत सरकारवर गोकुळचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आता या संपूर्ण प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेतं आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
‘…तर मग आमचे पक्ष का फोडले?’; खासदार संजय राऊत यांचा सवाल
Ans: गोकुळच्या एकूण 25 जागांपैकी सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या.
Ans: राज्य सरकारने गोकुळ संघावर 5 स्वीकृत संचालकांची नियुक्ती केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यांच्या मतदानाच्या अधिकारावरूनही वाद निर्माण झाला आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या दाव्यानुसार, महायुतीचे 12 संचालक उदयपूरमधील मॅरिएट हॉटेलमध्ये थांबले आहेत. यापूर्वी ते अलिबागमध्ये असल्याची चर्चा होती.






