कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; 'या' दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश
कोल्हापूर : सर्वधर्म समभाव विचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहात. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. अजित पवार म्हणाले की, ‘राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले. काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे ते पूर्ण करू, राहुल भैयांनी चूक केली असे वाटू देणार नाही; हा अजितदादांचा ‘शब्द’ आहे.
तसेच, मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. जन्माला आल्यानंतर समाजासाठी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, यासाठी काम करायचे असते. लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही, आम्ही जनतेच्या दारात पुन्हा गेलो. घेतलेलं कर्ज परतफेड करणारा शेतकरी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. आम्ही शेतकऱ्यांना सोलरवर वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
…ते येत्या काळात पूर्ण करू
पी. एन. पाटील आणि विलासराव देशमुख यांचे संबंध सांगत असताना लातूर आणि सडोली खालसा एक समीकरण झाले होते. आता यापुढे सुद्धा सडोली खालसा आणि काटेवाडी नात कशा पद्धतीने असेल हा संपूर्ण महाराष्ट्र पाहील, काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येत्या काळात पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राहुल पाटील, राजेश पाटील यांचा प्रवेश
पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पी .एन .साहेब आज नसले तरी ते आज आपल्याला पाहत आहेत. आपला कार्यकर्ता कसा वागतो आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पी. एन .पाटील यांनी राजीव गांधी यांना नेता मानले, नंतर विलासराव देशमुख यांना नेता मानले, त्यांना कधी सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले.