
पारनेरच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
राजकारणात विश्वास महत्त्वाचा असतो आणि कधी कधी विश्वासघातही होतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. “सुजित झावरे यांना ज्यांनी कात्रजचा घाट दाखवला, तेच आज समोर बसलेले लोक त्यांना दुसरा मार्ग दाखवतील,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचा पुनरुच्चार केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते बाबुशेठ टायरवाले, माजी सदस्य संदेश कारले, माजी सभापती नंदाताई शेंडगे, प्रशांत गायकवाड आणि रामदास भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैलगाडा चालक-मालक संघटना व ढवळपुरी येथील धनगर समाजातर्फे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “तुमच्या कोणत्याही कामांना स्थगिती मिळणार नाही. शिवसैनिक संकटाच्या काळात खंबीरपणे उभा राहतो. मी आणि माझे सात मंत्री सत्तेवर पाणी सोडूनही विकासाला प्राधान्य दिले. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अडीच वर्षांत मी साडेचारशे कोटींचा विकासनिधी दिला. ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. विरोधक कोर्टात गेले, पण मी सांगितले, ही योजना कधीही बंद होणार नाही.”
तसेच पारनेर विकास आराखड्यास तत्काळ मंजुरी आणि सुपे येथील कचरा डेपोचे प्रलंबित प्रकरण लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यात वाढलेल्या बिबट्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. पिंपरखेड येथील दोन व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. “संपूर्ण तालुके बिबटेमुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू,” अशी त्यांनी भाषणातून हमी दिली.
सुजित झावरे म्हणाले, “माझ्याकडे ना साखर कारखाना आहे, ना एखादी संस्था. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी लोकांची कामे विकासनिधीतून केली. जर माझा निधी कुणी थांबवला, तर शिंदे साहेब तुमचा हात माझ्या डोक्यावर लागेल.” यावेळी त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याबद्दल सभास्थळी मोठी चर्चा रंगली.