
लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? (photo Credit- X)
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता ‘आगाऊ’ वितरित करण्यास स्थगिती दिली आहे. मात्र, महिलांना त्यांचा नियमित हप्ता आणि थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरू असलेल्या योजनांचे नियमित लाभ थांबवले जाऊ शकत नाहीत. मात्र, मतदारांवर प्रभाव टाकेल असा कोणताही ‘जास्तीचा’ किंवा ‘आगाऊ’ लाभ देणे नियमांचे उल्लंघन ठरते.
Maharashtra Election Commission bars state govt from releasing January stipend for ‘Ladki Bahin’ scheme amid civic polls model code. pic.twitter.com/opGz4GAZio — Press Trust of India (@PTI_News) January 12, 2026
याच आधारावर, सरकारने १४ जानेवारी (मकर संक्रांत) पूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित ३,००० रुपये देण्याची तयारी केली होती. परंतु, याविरोधात असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले आणि ‘आगाऊ’ लाभ देण्यास मनाई केली.
१. आगाऊ लाभ नाही: जानेवारी महिन्याचे पैसे १४ जानेवारीला देता येणार नाहीत, ते नियमित वेळेनुसारच द्यावे लागतील.
२. थकबाकी देण्यास परवानगी: ज्या महिलांचे मागील हप्ते तांत्रिक कारणास्तव रखडले आहेत, त्यांची थकबाकी देण्यास आयोगाची आडकाठी नाही.
३. नवीन लाभार्थी नाही: आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही नवीन महिलेची या योजनेसाठी निवड करता येणार नाही.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला. हे सरकार महिलांचे लाडके भाऊ नसून ‘स्वार्थी भाऊ’ आहेत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या अपेक्षेने हा निधी वाटला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दोन महिने योजनेचा निधी वाटला नाही आणि आता मतदानाच्या तोंडावर एकदम पैसे जमा करण्याचा प्रयत्न आचारसंहितेचा भंग असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
मकर संक्रांतीला दुप्पट हप्ता मिळेल या आशेवर असलेल्या लाखो महिलांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणामुळे आता महिलांना केवळ त्यांचा नियमित १५०० रुपयांचा हप्ताच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार