Drug Mafia Lalit Patil Case
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयातील निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देवकाते यांना अटक केली आहे. प्रमुख डॉक्टरांमधील दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक
आजारी असल्याचा बहाणा करून ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याला कारागृहातून ससूनमध्ये पाठविण्यासाठी हेतूपरस्परमदत केल्याच्या संशयातून आणि आरोपींच्या संपर्कात असल्याने नुकतीच येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक केली. त्यापूर्वी येरवडा कारागृहातील कौन्सिलर तसेच एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक केली होती.
दरम्यान, त्याच्या पलायनामुळे मात्र पोलिसांवरच प्रश्न निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ तब्बल दोन अधिकाऱ्यांसह १२ पोलिसांना निलंबित केले होते. त्यानंतर याप्रकरणात एक-एक अटक करण्यास सुरूवात केली. ललितच्या पलायनप्रकरणात आता डॉक्टरची दुसरी अटक झाली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.
कारागृहाचा पोलीस निलंबित
पुणे पोलिसांनी ललित पाटीलप्रकरणात बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोन अधिकाऱ्यांसह १० पोलिसांना निलंबित केले. तर, दोन पोलिसांना अटकही केली. नुकतीच कारागृहाचा शिपाई मोईस शेखला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर त्याला कारागृह सेवेतून निलंबित करण्याचे आदेश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. मोईस व येरवडा कारागृहाचे कौन्सिलर सुधाकर इंगळेंना गेल्या आठवड्यात अटक केली. ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.