डोंबिवली : अनधिकृत इमारतीची तक्रार केली म्हणून तक्रारदाराच्या घरावर भूमाफियांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोपर परिसरात घडली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मात्र पिडीत कुटुंबिय भयभीत आहेत. शिंदे गटाचा एका माजी नगरसेवकाचा या भूमाफिया पाठीशी घालत असल्याचा आराेप पिडीत कुटुंबियांनी केला आहे. पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे ही संपूर्ण हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु केलं. सुधाकर पावशे यांनी या प्रकरणाची तक्रार महापालिकेस केली. महापालिकेने कारवाई करण्यात येईल असे सांगितले. मात्र कारवाई काही केली नाही. वारंवार पाठपुरावा करुन देखील महापालिकेने कारवाई केली नाही. सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोक आयुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. ती कारवाई देखील केवळ थातूरमातूर होती. केडीएमसी अधिकारी कारवाई करुन निघून गेले. त्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिला आल्या. महिलांनी सुधाकर पावशे यांना घराबाहेर या असे सांगितले. सुधाकर पावशे घराबाहेर आले नाहीत. तेव्हा महिलांनी त्यांचे दार ठाेठावले, त्यांची नेम प्लेट तोडली, घराच्या बाहेरच्या वस्तूंची नासधुस केली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सुधाकर पावशे यांचे म्हणणे आहे की, एक तर माझ्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे. त्याची तक्रार केली, तर महापालिका दुर्लक्ष करते. कारवाई थातूरमातूर केली जाते. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात. शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरुन हे सगळे सुरु आहे. सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आज आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. मी आपल्या घरातच कुटुंबियांसह राहतो. बाहेर पडत नाही. पोलीस देखील ज्याप्रकारे या प्रकरणात दखल घेतली पाहिजे, तशी दखल घेतली नाही.
कल्याण डाेबिवली महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी हजारो अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. भूमाफियांना राजकीय संरक्षण असल्याने पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. एखादा व्यक्ती अनधिकृत बांधकामांची तक्रार करतो. तर त्याच्या घरावर हल्ला केला जातो. त्यामुळे सरकारने या कडे लक्ष दिले पाहिजे.