
शहीद अर्जुन जाधव अनंतात विलीन
मसूर : शहापूर (ता.कराड) येथील जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशसेवा बजावत असताना भीषण स्फोट होऊन वीरमरण आलेले जवान अर्जुन जाधव अनंतात विलीन झाले. सैन्य दलातच असलेले शहीद अर्जुन जाधव यांचे बंधू ऋषिकेश व अर्जुन यांच्या 11 महिन्यांच्या सुर्वेश या चिमुकल्याने त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. शुक्रवारी शासकीय इतमामात व लष्करी मानवंदनेसह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या अश्रुपूर्ण नयनात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘अर्जुन जाधव अमर रहे’ या घोषणांच्या गजरात आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला.
देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण स्फोटात अर्जुन जाधव यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी जिल्ह्यात पोहोचताच संपूर्ण शोककळा पसरली होती. त्यांच्या बलिदानाबद्दल अभिमान व्यक्त होत त्यांच्या अकाली जाण्याचे हळहळ व्यक्त केली गेली. शुक्रवारी सकाळी अर्जुन जाधव यांचे पार्थिव शहापूर येथे दाखल झाले. गावाच्या वेशीवर हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. लष्करी वाहनातून पार्थिव गावात आणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी अश्रुपूर्ण नजरेने आपल्या वीर जवानाला अभिवादन केले.
पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन’, २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी
पार्थिव गावात आल्यानंतर प्रथम त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. आपल्या लाडक्या मुलाचे पार्थिव पाहताच आई-वडिल, पत्नी सायली व त्यांच्या कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. अनेकांच्या डोळ्यांतूनही अश्रूंचा बांध फुटला. संपूर्ण वातावरण शोकमग्न झाले. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी पार्थिव शहापूर गावातील मुख्य चौकात ठेवण्यात आले. हजारो नागरिकांनी रांगा लावून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती
प्रशासकीय, राजकीय पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी सैनिक, पोलीस अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्कर, पोलीस दलाच्या जवानांनी शहीद अर्जुन जाधव यांना मानवंदना दिली. विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शौर्यपूर्ण बलिदान अन् अभिमानही
देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे अर्जुन जाधव हे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे भूषण होते. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण जिल्हा दुःखात बुडाला. त्यांच्या देशप्रेमाची शौर्याची गाथा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. देशसेवेसाठी शहीद झालेले जवान अर्जुन जाधव यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले जात असतानाच त्यांच्याबद्दल मोठा अभिमानही बाळगला जात होता.
15 जूनला येणार होते सुट्टीवर
अर्जुन जाधव हे येत्या १५ जून रोजी सुट्टीवर शहापूरला गावी येणार होते. २५ जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने तयारी सुरू होती. कुटुंबीय आनंदात होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. देशसेवेच्या कर्तव्यात असतानाच अर्जुन यांना वीरमरण आले. चिमुकल्याच्या वाढदिवसाचा आनंद नियतीने हिरावून घेतला. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घ्यावे लागले.