पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी 'अन्नत्याग आंदोलन'
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. रोहित पवार अन्नत्याग आंदोलनाला बसल्यापासून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळण्यास सुरवात झाल्याचे दिसून आले. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. यावेळी रोहित पवारांनी ‘विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू,’ असा विश्वास व्यक्त केला.
पंढरपूरमधील छ. शिवाजी महाराज चौक येथे रोहित पवारांकडून आंदोलन करण्यात आले. अन्नत्याग आंदोलनस्थळी जात असताना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या मठात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रोहित पवारांनी अभिवादन केलं आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आणि तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र नामदेव पायरीवर माथा टेकून आशीर्वाद घेतले.
यानंतर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी रोहित पवारांना विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनापूर्वी पोलिसांनी बॅरिकेड्स टाकत मार्गात अडथळे आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय… त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं. उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय… पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये…!” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. रोहित पवार अन्नत्याग आंदोलनाला बसल्यापासून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळण्यास सुरवात झाल्याचे दिसून आले. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. मध्य प्रदेशातील मा. आमदार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, संपादक डॉ. सनीलम यांनी पंढरपूरच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी येऊन या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दर्शवला. तसेच यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रा. सुशीलाताई मोराळे यांच्यासह राज्यभरातील शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






