
एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू; मोठ्या भावाने जग सोडताच लहान भावानेही सोडले प्राण
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची अखेरची ठरेल, असे कुणालाही वाटले नव्हते. केळगाव (ता. निलंगा) येथील भाऊराव निवृत्ती राठोडकर (वय ८५) आणि त्यांचे सख्खे भाऊ माणिक निवृत्ती राठोडकर (वय ८२) यांचे शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) एकाच दिवशी निधन झाले. एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने राठोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
वृद्धापकाळामुळे भाऊराव राठोडकर आजारी होते. मोठ्या भावाची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच माणिक राठोडकर त्यांची विचारपूस करण्यासाठी घरी गेले. भाऊ जग सोडून गेल्याचे पाहून धक्का सहन न झाल्यामुळे माणिक राठोडकर यांनीही प्राण सोडले. भावाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी करण्याची ही भेटच त्यांच्या आयुष्यातील अखेरची ठरली आहे.
नियतीने दोन्ही भावांना एकाच दिवशी हिरावले
एकमेकांच्या सुख-दुःखात आयुष्यभर साथ देणाऱ्या या दोन भावांनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने हा योगायोग प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला. दोन्ही भावांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते होते. आयुष्याच्या संध्याकाळीही ते एकमेकांची काळजी घेत असत. मोठ्या भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेलेल्या माणिक राठोडकर यांची ती भेट आता केवळ आठवण बनली आहे. ज्या भावाला भेटण्यासाठी ते गेले, त्याच भावासोबतची ती शेवटची भेट ठरली, ही बाब कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. दोन सख्ख्या भावांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ सुन्न झाले. कुटुंबातील दोन आधारवड एकाच दिवशी हरपल्याने राठोडकर कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
भाऊराव राठोडकर यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माणिक राठोडकर यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. भावाची चिंता मनात घेऊन झालेली भेट आणि त्याच दिवशी दोन्ही भावांचा जीवनप्रवास संपला. नियतीच्या या हृदयद्रावक योगायोगाने केळगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
केळगावात अंत्यसंस्कार
राठोडकर कुटुंबीयांच्या दुःखात नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ सहभागी झाले. दोन्ही भावांच्या पार्थिवदेहावर केळगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.