
वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू
पिंपरी : प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. लोकमान्य हॉस्पिटलशेजारी, निर्मल विला बंगल्यासमोर घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी वर्षभरापूर्वी अशाच प्रकारच्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भूमिगत डक्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकमान्य हॉस्पिटलकडून भेळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन डक्टमध्ये काही कामानिमित्त दोन तरुण उतरले होते. मात्र, डक्टमध्ये उतरल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला असावा. काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. मनोज बाबुराव शिंदे (वय २६, रा. नाशिक जेल रोड, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
वर्षभरात पुन्हा दोन बळी; यंत्रणेला जाग कधी येणार?
विशेष म्हणजे, साधारण वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अशाच स्वरूपाच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात त्याच ठिकाणी पुन्हा दोन तरुणांचा जीव गेल्याने मागील दुर्घटनेनंतरही सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या होत्या का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
डक्टमध्ये उतरण्यापूर्वी ऑक्सिजन तपासला होता का?
भूमिगत डक्टमध्ये उतरण्यापूर्वी ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली होती का? विषारी अथवा ज्वलनशील वायूंची तपासणी झाली होती का? कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली होती का? तसेच डक्टमध्ये उतरण्यासाठी कोणत्या प्रकारची सुरक्षा प्रक्रिया पाळण्यात आली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
घटनास्थळाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनही पाचारण करण्यात आली आहे. त्यामुळे दोन तरुणांच्या मृत्यूमागे नेमका कोणता घातक घटक कारणीभूत ठरला आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. एकाच ठिकाणी वर्षभराच्या अंतराने पाच जणांचा जीव गेल्याने संबंधित भूमिगत डक्टची सुरक्षितता आणि त्याच्या देखभालीबाबत आता प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.