
Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी युसूफ सय्यद याला दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले असून, दुसऱ्या पत्नीचा अरमान हा एकुलता एक मुलगा होता. युसूफने यापूर्वीच पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलांना मालमत्तेत वाटणी दिली होती. त्यामुळे “माझ्या मुलालाही मालमत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे,” अशी मागणी दुसरी पत्नी सातत्याने करत होती. यावरून पती-पत्नीत वारंवार खटके उडत व वाद सुरू होते.
गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी रात्री युसूफ हा लहानगा अरमान याला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर रात्रभर घरी परतला नाही. दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने चिंतेत पडलेल्या दुसऱ्या पत्नीने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन मुलं व पती गायब असल्याबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये ५ नोव्हेंबरच्या रात्री ९:३० वाजेच्या सुमारास युसूफ हा अरमानचा हात धरून घरामागील शेताकडे जाताना स्पष्ट दिसून आला. मात्र, तासाभराने तो एकटाच घराकडे परतताना कॅमेऱ्यात कैद झाला. या संशयास्पद फुटेजच्या व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोध घेत आरोपी युसूफला परभणी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर रविवारी (८ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरामागील शेतातील नाल्याच्या पानातून अरमानचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.
लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, “मिसिंग असलेल्या मुलाचा मृतदेह शेतातील नाल्यात आढळला असून तो कुजलेला होता. ५ नोव्हेंबर रोजीच त्याचा खून झाला असावा असा अंदाज आहे. मालमत्तेच्या वादातूनच हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.” दरम्यान, या कायदेशीर बाबींवर बोलताना कायदेतज्ज्ञांच्या मते, मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत पुरुषाला एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी असली, तरी कायद्यानुसार पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही पत्नीपासून झालेली वैध मुले वडिलांच्या मालमत्तेतील वारसाहक्कापासून वंचित राहू शकत नाहीत. पहिल्या पत्नीच्या मुलांप्रमाणेच दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही मालमत्तेत समान हक्क मिळतो. असे असूनही केवळ विकृत मानसिकतेतून हा घातपात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: ही घटना लातूरमधील सुळ गल्ली परिसरात घडली.
Ans: मृत बालकाचे नाव अरमान युसूफ सय्यद (वय ७) असे असून, आरोपी त्याचे वडील युसूफ मुबारक सय्यद (वय ५८) हे आहेत.
Ans: परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपी युसूफला परभणी येथून ताब्यात घेतले.