पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशमच्या यांच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, बाणेर, येथे ७१ व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ‘सतेज करंडक’ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या पुणे लीग स्पर्धेतील पहिल्या सामन्यात लयभारी पिंपरी चिंचवड संघाने शिवनेरी जुन्नर संघावर ५४-५२ अशा निसटता विजय मिळविला, मध्यंतराला लयभारी पिंपरी चिंचवड संघाकडे ३७-१७ अशी आघाडी होती. लयभारी पिंपरी चिंचवडच्या अमरजीत चव्हाण व आशिष पाडाळे यांनी सुरेख चढाया केल्या व सिध्दराज मुरुमकर याने पकडी घेतल्या.
बलाढ्य बारामतीचा पुणे संघावर विजय
मध्यंतरानंतर शिवनेरी जुन्नरच्या प्रविण बाबर, शुभम बिटके यांनी जोरदार आक्रमण करीत आपल्या संघाला विजयाच्या जवळ समिप आणले. ओंकार पाष्टे याने पकडी घेतल्या. दुसऱ्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने वेगवान पुणे संघावर ४९-३४ अशी मात केली. मध्यंतराला बलाढ्य बारामती व वेगवान पुणे संघ २२-२२ अशा समान गुणांवर होते. बलाढ्य बारामतीच्या आकाश बर्गेने चौफेर चढाया केल्या. तर चेतन पारधे याने पकडी घेतल्या. वेगवान पुणे संघाच्या अजय चव्हाण याने चढाया केल्या तर प्रणीत काळे याने पकडी घेतल्या.
काल पुणे, रायगडने मिळवला होता विजय
काल मध्यंतराला पुणे शहर संघाकडे २८-१७ अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या सुनील दुबिले व मनोज बोंद्रे यांनी सुरेख खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला होता. नांदेडच्या शक्ती शेडमाडे, अजय राठोड यांनी काहिसा प्रतिकार केला. तर सौरभ राठोड यांने पकडी घेतल्या. ब गटात रायगड संघाने सोलापूर संघावर ५९-१७ असा विजय मिळविला. मध्यंतराला रायगड संघाकडे ३५-५ अशी भक्कम आघाडी होती. वैभव मोरे व अनुराग सिंग यांनी चौफेर चढाया करीत आघाडी घेतली. सुमित पाटील व राकेश गायकवाड यांनी पकडी घेतल्या. सोलापूरच्या कुमार चव्हाण, अनिकेत वाघमारे यांनी काहीसा प्रतिकार केला तर प्रफुल कांबळे व बाळु व्हरांडे यांने पकडी घेतल्या.