फोटो सौजन्य - Social Media
मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यात अमलीपदार्थविरोधी मोहिम अधिक तीव्र करत पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर गुरुवारी (दि. १८) रात्री एलसीबीच्या पथकाने साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारात धाड टाकून लाखो रुपयांचा गांजा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात गांजा व तत्सम अंमलीपदार्थांची साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सुनील अंबुलकर यांना दिले होते. त्यानुसार, एलसीबीने स्वतंत्र पथक तयार करून संशयित ठिकाणांवर गुप्त माहितीच्या आधारे लक्ष ठेवले होते. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार साखरखेर्डा हद्दीतील मलकापूर पांग्रा येथील एका कपाशी व तुरीच्या शेतात अंमलीपदार्थांची साठवणूक असल्याचे समोर आले.
एलसीबीच्या पथकाने संबंधित शेतात छापा टाकला असता उभ्या पिकांमध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. शेतामध्ये ओलसर तसेच सुकलेली गांजाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून आली. ही गांजाची लागवड शेतातील इतर पिकांच्या आडोशाला करण्यात आली असल्याने प्रथमदर्शनी ती लक्षात येणे अवघड होते. मात्र, पथकाच्या सूक्ष्म तपासामुळे संपूर्ण प्रकार उघड झाला.
या कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने शेतातून ओलसर गांजाची झाडे तसेच सुकलेली गांजाची झाडे असा एकूण १२ लाख ५२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुधाकर संपतराव गायकवाड (वय ६५, रा. मलकापूर पांग्रा) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीविरुद्ध साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यशोदा कणसे, पोलिस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, गजानन दराडे, वनिता शिंगणे, विजय वारुळे, दीपक वायळ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे आणि समाधान टेकाळे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, जिल्ह्यात अमलीपदार्थांची साखळी मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मिशन परिवर्तनअंतर्गत अमलीपदार्थमुक्त जिल्हा घडविण्याच्या दिशेने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.






