कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; शशिकांत कांबळे यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात मनसेच्या गटनेता कार्यालयाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत मिळून ‘शिव विकास आघाडी’ हा गट कोकण विभागीय आयुक्तांकडे स्थापन केल्याचे सांगितले आहे. असे असताना मनसेला स्वतंत्र गटनेता कार्यालय कशाच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या संबंधित नियमांचा हवाला देत कांबळे यांनी आयुक्तांकडे १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याची तसेच करण्यात आलेल्या किंवा प्रस्तावित कारवाईची माहिती देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासंदर्भात केलेल्या कृतीनंतर राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील सत्तासमीकरणांवरही चर्चा सुरू झाली होती. मनसेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याचेही समोर आले होते. मात्र, या मागणीवरून पुढे ठोस निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले नाही. यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेविका शीतल भंडारी या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती.
पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता
आता मनसेच्या गटनेता कार्यालयावर भाजपने आक्षेप घेतल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आयुक्त या पत्रावर काय भूमिका घेतात आणि त्यातून भाजप-मनसेमधील वादाला कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
FAQ
कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे वाद पुन्हा का पेटला?
– मनसेला गटनेता कार्यालय उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी आक्षेप घेत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
केडीएमसीत सत्तेचे गणित काय? मनसे कशी सत्तेत आली?
– 122 सदस्य – 2026 निवडणूक निकाल : शिवसेना (शिंदे) – 53 जागा – सर्वात मोठा पक्ष. भाजप – 50 जागा, मनसे – 5 जागा (स्वतंत्र गट करून) शिवसेना UBT – 11, काँग्रेस 2, NCP (SP) 1महायुती – 53+50+5 = 108 – स्पष्ट बहुमत
पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे का?
– आता मनसेच्या गटनेता कार्यालयावर भाजपने आक्षेप घेतल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.






