कल्याण : वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे वाईन शॉपमध्ये काम करण्याऱ्या एक कर्मचारी दररोज पाच ते सहा हजार रुपयांची दारु चोरायचा इतर दोन साथीदारांना ती दारु बाहेर विकायला लावायचा. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटविली. गेल्या साडे तीन महिन्यापासून चोरीचा हा धंदा सुरु होता.
कल्याण पूर्वेतील नेतविली परिसरातील जी. के. वाईन शॉप आहे. या शॉप मालक यांच्या लक्षात आले की, दारु विक्रीचा हिशोब जुळून येत नाही. जवळपास सहा लाखांची दारु या चोरटयांनी चोरी केली आहे. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोळसेवाडी पोलीस तपास करीत होते. कल्याण क्राईम ब्रांचही याचा तपास करीत होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. १३ एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की, सुनिल कुंदन हा एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे सुनिल कुंदन हा त्या वाईन शॉपमध्ये काम करणारा आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून सुनिल कुंदन हा पसार झाला होता. सुनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली. सुनील कुंदन हा तरुण वाईन शॉप काऊंटरवर उभा राहायचा. त्याचे दोन मित्र एक दिवसा आड आलटून पालटून वाईन शॉपमध्ये दारु घेण्याच्या बहाण्याने जायचे. सुनिल चलाखी दाखवीत पाच ते सहा हजाराची दारु या दोघांना द्यायचा. आतापर्यत सहा लाखांची दारु या दोघांना दिली. ही दारु हे तिघे बाहेर विकायचे. यांच्याकडून काही दारु पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सुरु आहे.