फोटो - सोशल मीडिया
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भुसार प्रमुख यांच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे प्रभारी सचिव बाळासाहेब तावरे यांनी सहसचिव महादेव शेवाळे यांच्याकडे भुसार प्रमुख पदाचा पदभार दिला आहे. मात्र भुसार प्रमुख प्रशांत गोते यांची चौकशी पूर्ण होई पर्यंत त्यांना मार्केट यार्ड बाजार समिती मधून हटवावे अन्यथा बडतर्फ करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आमदार माधुरी मिसाळ यांनी पणन संचालक यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी भुसार प्रमुखच्या विरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून चौकशी पूर्ण होईपर्यंत भुसार प्रमुख यांची इतर बाजार समितीमध्ये बदली करावी अथवा बडतर्फ करावे अशी मागणी व्यापारी व आमदार यांनी केली. मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात गाळेधारकांना सेस, दप्तर तपासणी, व्यापार परवाने देणे याबाबत विविध प्रकारांच्या नोटीसा पाठवून कारवाईचा फार्स दाखवून विशेष शुल्क घेतले जात असल्याचे प्रकार होत असल्याचे व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.
भुसार विभाग प्रमुख प्रशांत गोते यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या असून व्यापाऱ्यांनी कोणतीही भिती न बाळगता तक्रार करावी अथवा माहिती द्यावी त्यांची नावे गोपनीय ठेऊन पारदर्शक चौकशी करून कारवाई करण्यात येईलअसे मत महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी व्यक्त करत व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे.