Malnutrition Maharashtra: राज्यात ३ वर्षांत ४० हजार बालमृत्यू ! कुपोषणाचा डाग पुसण्यात सरकार अपयशी?
Malnutrition Maharashtra: राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी गेल्या तीन वर्षांत राज्यात तब्बल ४० हजार ५५९ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. राज्यातील कुपोषणाचे संपूर्ण निर्मूलन करण्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आदिती तटकरे यांनी पोषण ट्रॅकरवरील आकडेवारी सभागृहात मांडली. त्यानुसार, राज्यातील बालकांचे वजन व उंची मोज मोजून त्यांची सामान्य, मध्यम कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशा श्रेणींमध्ये नोंद केली जाते.
लेखी उत्तरात नमूद केल्यानुसार, मार्च २०२४, मार्च २०२५ आणि मार्च २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात एकूण ४० हजार ५५९ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हे सर्व मृत्यू कुपोषणामुळे झालेले नसून मुदतपूर्व जन्म, संसर्गजन्य आजार, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, जन्मतः श्वासावरोध, जन्मजात व्यंग तसेच न्यूमोनिया यांसारख्या वैद्यकीय कारणांमुळे बालमृत्यू झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील कुपोषणाचे प्रमाण घटत असल्याचेही सरकारने सांगितले. आदिवासी व दुर्गम भागांमध्ये विविध पोषण योजनांद्वारे बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी, संयुक्त स्क्रीनिंग आणि पूरक आहाराच्या माध्यमातून कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहितीही उत्तरात देण्यात आली.
महाराष्ट्रातील बालमृत्यू आणि कुपोषणाच्या आकडेवारीनुसार, मागील ३ वर्षांत राज्यात ४०,५५९ बालमृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे झाले आहेत. तर मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण २३३३९ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.
मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार, राज्यात १,३३,२८० मध्यम कुपोषित बालके आहेत. मागील तीन वर्षांच्या बालमृत्यूच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १४,५२६, २०२५ मध्ये १३,७०७, १२,३२६ आणि २०२६ जूनपर्यंत २३,३३९ बालमृत्यूंची आकडेवारी वेगवेगळ्या कालावधीतील व जिल्ह्यांनुसार नोंदवली गेली आहे.






