
Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, 'या' दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार
राज्यातील अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलं. दुबार पेरणी केल्यानंतर पावसानं याकडे पाठ फिरकल्याने पिकं वाळून गेली. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाची घोषणा केली. त्यानंतर आता राज्यातील दुष्काळाची दळक केंद्र सरकारने घेतली आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती मागवली आहे. तसेच येत्या 3 ऑक्टोबरनंतर रोजी केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वतः कृषी मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्र्यांना थेट बांधावर आपलं गाऱ्हाणं मांडण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषीमंत्र्यांचं केंद्रीय पथक जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा येथील शेतकऱ्याला केंद्राकडून भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा असेल. हाता तोंडाला आलेला घास पावसानं हिरावून नेल्यानं आता बळीराजा केंद्र व राज्य शासनाच्या मदतीकडे आस लावून बसला आहे. त्याला केंद्र सरकार कशाप्रकारे मदत करते ते पाहणे उस्तुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असल्याचे नमूद करत शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकार राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून आर्थिक मदत करण्यात येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे, राज्य सरकारने जाहीर केलेली अधिसूचना विरोधी पक्षाच्या पचनी पडली नाही आहे. त्या अधिसूचनेत अनेक दुरुस्तीकरण्यासारख्या गोष्टी असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. आधीच ज्या सुविधा शेतकऱ्यांना मिळतात, त्याच सुविधा त्यात नमुद असल्याचेही त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यात 17 मागण्या केल्या आहेत. तसेच तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणीही शरद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.