(Photo - Social Media)
Karad News : राज्य सरकारने महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, या यादीत कराड तालुक्याचा समावेश झालेला नाही. दुसरीकडे कराडच्या काही भागांत पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून कराड तालुक्यातील परिस्थितीचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील खरीप क्षेत्र सुमारे ३२ हजार ५०० हेक्टर आहे. यापैकी १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून तब्बल १९ हजार हेक्टर क्षेत्र जिरायती आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास जिरायती शेतीवर त्याचा थेट फटका बसतो.
उंडाळे, येवती, काले, मसूर, इंदोली आणि उंब्रज या महसूल मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे केवळ काही मंडळांचा विचार न करता संपूर्ण तालुक्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन कराडला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच राज्यातील दुष्काळ जाहीर न झालेल्या ९३ तालुक्यांचा मंडळनिहाय सर्व्हे करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. एखाद्या तालुक्यातील बहुसंख्य महसूल मंडळे ‘ट्रिगर-१’ निकषांमध्ये बसत असतील, तर त्या संपूर्ण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी त्यांची भूमिका आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामेही तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. नवीन साखळी बंधारे उभारण्यास प्राधान्य द्यावे, तसेच जुन्या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे लगेच सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
ही कामे रोहयो आणि मनरेगा अंतर्गत राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारासोबतच पाणीसाठा वाढवण्याचा दुहेरी फायदा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे. आता कराड तालुक्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन






