महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन, उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास (फोटो सौजन्य-X)
मुंबई : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून होते असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल “Model Y” आज भारतात लाँच करण्यात आले असून, या कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर ६०० किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून, तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचा पहिला शोरूम सुरू झाला आहे. ४००० चौरस फूट जागेवर पसरलेल्या या शोरूममध्ये केवळ कारच विकल्या जाणार नाहीत तर लोकांना टेस्लाचे तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्येही जवळून पाहता येतील. सध्या टेस्ला या शोरूममधून मॉडेल वाय विकणार आहे. टेस्लाने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ४,००० चौरस फूट रिटेल जागा ५ वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. या शोरूमचे भाडे दरमहा सुमारे ३५ लाख रुपये आहे.
भारतातील टेस्ला कारची किंमत अमेरिकेपेक्षा ३२ लाख रुपये जास्त असेल. या कार चीनमधून आयात केल्या जातील. मॉडेल वाय कारच्या बेसिक मॉडेलची किंमत आयात शुल्काशिवाय २७ लाख रुपये आहे, ही कार भारतात आणण्यासाठी टेस्ला सरकारला आयात शुल्क आणि करसह सुमारे २१ लाख रुपये देईल. अशा प्रकारे, ग्राहकांसाठी त्याची किंमत सुमारे ४८ लाख रुपये असेल, परंतु कंपनीच्या वेबसाइटवर त्याची किंमत सुमारे ६० लाख रुपये आहे, जी अमेरिकेपेक्षा सुमारे २८ लाख रुपये जास्त आहे. त्याची ऑन-रोड किंमत सुमारे ६१.०७ लाख रुपये असेल.