
Municipal Election Voting 2026 in Marathi
15 Jan 2026 10:15 AM (IST)
बीएमसी निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान न करताच निघून जावे लागले. जेव्हा ते ऑनलाइन मिळालेल्या क्रमांकासह मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांची नावे तेथे सूचीबद्ध नाहीत. बीएमसी निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या एका मुंबईकराने सांगितले की, "आम्हाला ऑनलाइन मिळालेला क्रमांक येथे जुळत नाही. हे संस्थेचे अपयश आहे. मला मतदान न करताच निघून जावे लागत आहे."
15 Jan 2026 10:00 AM (IST)
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीनिमित्त मतदान केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, "मी ८० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ दांपत्यांनाही उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर पडताना पाहिले, हे खरोखर प्रेरणादायी आहे. अनेक वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांनी लोकशाहीप्रती आपली निष्ठा सिद्ध केली आहे. मी सर्वांना यातून प्रेरणा घेऊन मतदान करण्याचे आवाहन करतो." "मला 'जनरेशन झेड'वर (Gen Z) पूर्ण विश्वास आहे. ही तरुण पिढी हुशार आहे आणि ती दूरदृष्टीने विचार करते. केवळ १५ मिनिटांचे मतदान पुढील पाच वर्षे सुशासन देऊ शकते, हे त्यांना चांगले समजते."
VIDEO | Mumbai: On BMC polls, Union Minister Piyush Goyal says, "I saw even an 80-plus couple coming diligently to vote - truly inspirational. Many elderly and differently-abled citizens showcased their commitment to democracy. I urge everyone to take inspiration and vote. I have… pic.twitter.com/ozyh6i7DRM
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan 2026 09:55 AM (IST)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केले. ते म्हणाले, "निवडणुका होत आहेत, जे योग्य आहे. परंतु ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष, त्यांच्या लोकांद्वारे पैसे वाटत होता आणि इतर पक्षांचे उमेदवार त्यांना विरोध करत होते, त्यामुळे पोलिसही भाजपला पाठिंबा देत होते. तथापि, मला वाटते की जनता सतर्क आणि जागरूक आहे."
15 Jan 2026 09:50 AM (IST)
Mumbai Municipal Election Voting राज्यातील महापालिका निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली. पण काही ठिकाणांहून पहिल्या तासातच EVM मशीन्समध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत प्रभाग क्रमांक १९२ मध्ये दुबार मतदार सापडल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे राजाचे वनमंत्री गणेश नाईक यांचेच नाव मतदार यादीत नसल्याचे दिसून आले आहे. या प्रकरानंतर गणेश नाईक चांगलेच संतापले होते.
गणेश नाईक यांचेच नाव मतदान यादीत नसल्यामुळे त्यांना या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावे लागले. यावर गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला. मी आमदार मंत्री असूनही मतदान करावे की नाही हा प्रश्न पडला आहे. मतदारानासाठी नेमके कोणते केंद्र आहे, असा गोंधळ झाल्याने नाईक यांना फिरावे लागले
15 Jan 2026 09:35 AM (IST)
Municipal Election Voting 2026 Live : पिंपरी- चिंचवडमधील नवी सांगवीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील केंद्र क्रमांक ३२ खोली क्रमांक नं. ३ येथील ईव्हीएम मशीन अर्धा तास उशिरा सुरू झालं. त्यामुळे भाजप आमदार शंकर जगतापांनी जास्तीचा वेळ मागितला आहे. त्याबाबत त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
15 Jan 2026 09:25 AM (IST)
Municipal Election Voting 2026 Live : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज (दि. 15) सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नाशिक शहरातील काही मतदान केंद्रांवर या अडचणींमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली. नाशिक महापालिकेच्या एकूण 122 जागांसाठी आज मतदान होत असून, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. कालच मतदान यंत्रे व मतदान कर्मचारी केंद्रांवर दाखल झाले होते.
15 Jan 2026 08:59 AM (IST)
नागपूर शहरात देखील मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी आहे. सर्वजण मतदान करण्यासाठी अतिशय उत्साहाने जात आहेत.
15 Jan 2026 08:50 AM (IST)
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, पुणेकरांनी भाजपाला समर्थन दिलं आहे. आम्ही आतापर्यंत जे काही काम केलं आहे, ते सर्व पुणेकरांसमोर ठेवलं आहे.
15 Jan 2026 08:40 AM (IST)
निवडणूक आयोगाने पाडू मशीन आणलं आहे. हे मशीन सगळीकडे ठेवलं जाणार आहे. याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
15 Jan 2026 08:30 AM (IST)
भाजपाने निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपाला नक्कीच त्यांची जागा दाखवेल. भाजपाने रात्रभर संभाजीनगरात पैशांचा पाऊस पाडला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
15 Jan 2026 08:23 AM (IST)
मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. आजच्या निवडणुकीसाठी मतदारांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.
15 Jan 2026 08:18 AM (IST)
ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी घरामध्ये देवपूजा केली आणि आता ते मतदान करण्यासाठी रवाना होणार आहेत.
15 Jan 2026 08:15 AM (IST)
महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अभिनेता सुमित राघवन आणि त्यांची पत्नी चिन्मयी राघवन मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. यावेळी सुमित राघवन म्हणाले की, मतदान हा लोकशाहीचा सण आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
15 Jan 2026 08:12 AM (IST)
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सज्ज असतानाच पोलिसांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे.
15 Jan 2026 08:06 AM (IST)
अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेचं चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
15 Jan 2026 07:50 AM (IST)
Municipal Election Voting 2026 Live: मुंबईतील दोन उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. वॉर्ड क्रमांक ११८ आणि १२२ मधील उमेदवारांविरोधात संघाने तक्रार दाखल केली आहे.
देश जनहित पार्टीकडून उमेदवारी देण्यात आलेल्या वैशाली जी आणि प्रशांत जी या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या दोघांचा उल्लेख प्रचारामध्ये संघाचे पुरस्कृत उमेदवार असा करण्यात आल्यामुळे मतदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप RSSकडून करण्यात आला आहे.
15 Jan 2026 07:45 AM (IST)
मतदान जनजागृतीसाठी मुंबईत ‘लाडकी बुलेट’ योजना सुरू करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबईतील बुलेट वर्ल्ड या व्यावसायिकांनी ही अनोखी कल्पना राबवली आहे. मतदान केल्याचा पुरावा दाखवल्यास बुलेट बाईकचे मोफत सर्व्हिसिंग दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत बाईकची मोफत तपासणी, इंजिन ऑइल बदल आणि मोफत वॉश यांसारख्या सेवा देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
15 Jan 2026 07:40 AM (IST)
मुंबईत महापालिका निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. अधिकृत प्रवेशिका असतानाही माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्यात येत आहे. केवळ मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण करण्यासच परवानगी दिली जात असल्याची भूमिका निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आली आहे. या निर्णयामुळे माध्यमांच्या कामकाजावर मर्यादा येत असून राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई वगळता राज्यातील इतर भागांत मात्र माध्यम प्रतिनिधींना कुठेही अडवणूक करण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
15 Jan 2026 07:30 AM (IST)
मतदानाची माहिती :
एकूण मतदान केंद्रे — ५१६
मतदानाची वेळ — सकाळी ७.३० वाजल्यापासून
मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी — ३,०५५
मतदान केंद्रांवर नियुक्त पोलीस कर्मचारी — ५१६
मतदार संख्या :
5) एकूण मतदार — ४ लाख ३८ हजार ५२३
पुरुष — २ लाख २५ हजार ३०८
महिला — २ लाख १३ हजार १७७
इतर — ३८
ईव्हीएम यंत्रणा :
6) बॅलेट युनिट — १,६००
कंट्रोल युनिट — ८००
15 Jan 2026 07:26 AM (IST)
राज्यातील महापालिकांच्या या महाकुंभात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यातील लढतींवर तर भाजप-शिवसेना विरोधात ब्रँड ठाकरे असा जंगी सामना रंगणार आहे.
15 Jan 2026 07:25 AM (IST)
राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये आज मतदान पार पडत आहे. विभागनिहाय महापालिकांची यादी पुढीलप्रमाणे —
15 Jan 2026 07:15 AM (IST)
Municipal Election Voting 2026 in Marathi: कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण ५९५ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेतील २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी ३२७ उमेदवार रिंगणात आहेत.शहरातील एकूण ४ लाख ५४ हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरात २१ उपद्रवी मतदान केंद्रे घोषित करण्यात आली असून, त्या ठिकाणी पोलिसांचा अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट अशी प्रमुख लढत होत आहे. तसेच राजर्षी शाहू विकास आघाडी आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात असल्याने काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.
15 Jan 2026 07:10 AM (IST)
Municipal Election Voting 2026 in Marathi नागपुरात महापालिका निवडणूक दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रभाग ११ मधील काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या घटनेत भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
15 Jan 2026 07:00 AM (IST)
मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसल्यास, त्याऐवजी खालील १२ पैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती शहर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मतदानासाठी ग्राह्य धरली जाणारी ओळखपत्रे पुढीलप्रमाणे —
पासपोर्ट
वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
पॅन कार्ड
आधार कार्ड
सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला
राष्ट्रीयीकृत बँका किंवा पोस्ट ऑफिस खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
मनरेगा अंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
निवृत्तिवेतनाशी संबंधित दस्तऐवज
संसद, विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
केंद्र किंवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
स्वातंत्र्यसैनिकांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
वरीलपैकी कोणताही एक वैध ओळखपत्र सादर केल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.
15 Jan 2026 06:50 AM (IST)
Municipal Election Voting 2026 in Marathi : पुणे शहरातील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. यंदा पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार असून महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादींचे आव्हान असून, शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि मनसेही निवडणूक रिंगणात आहेत.
एकूण उमेदवार: १,१५३
एकूण मतदार: ३५ लाख ५२ हजार ६३७
पुरुष मतदार: १८ लाख ३२ हजार ७८९
महिला मतदार: १७ लाख १३ हजार ३६०
इतर मतदार: ४८८
एकूण मतदान केंद्रे: ४,०११
बिनविरोध निवडून येणारे उमेदवार: २
15 Jan 2026 06:46 AM (IST)
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष आहेत. येथे लढाई चौकोनी आहे, ज्यामध्ये महायुती (भाजप + शिंदे सेना), महाविकास आघाडी (यूबीटी + राष्ट्रवादी, शरद पवार + काँग्रेस), मनसे आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने आहेत.
15 Jan 2026 06:41 AM (IST)
Municipal Election Voting 2026 in Marathi :महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आज महाराष्ट्राकडे लागले आहे.
राज्यातील एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी राज्यभरात ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी राज्यात एकूण १५ हजार ९०८ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे ४ सदस्यीय असून काही प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय आहेत. त्या त्या प्रभागातील सदस्यसंख्येनुसार मतदारांना तेवढीच मते द्यावी लागणार आहेत. त्यासाठी ईव्हीएमवर ४ वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका असतील. या निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच १६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.