एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे मतदान केंद्रे दिल्याने गोंधळ निर्माण झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे शहरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वॉर्डांतील मतदार यादीत नोंदवली गेल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. या गोंधळामुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे देखील वाचा : नागपूरमध्ये महाभारताचा दाखला देत NOTA वर गरजले मोहन भागवत, मतदान देत काय केले आवाहन?
अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे की, एकाच घरात राहणारे पती-पत्नी, पालक आणि मुले यांची मतदान केंद्रे आणि वॉर्ड क्रमांक वेगवेगळे दाखवले गेले आहेत. काही ठिकाणी तर पतीचा मतदान केंद्र एक प्रभागात, तर पत्नीचा दुसऱ्याच प्रभागात असल्याचे चित्र आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांना अनावश्यक धावपळ करावी लागत असून, काहीजण तर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम
या परिस्थितीचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “मतदान हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, मतदार यादीतील अशा चुका लोकशाही प्रक्रियेवरच आघात करणाऱ्या आहेत,” अशी प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून उमटत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरत आहे. राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावर प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी मतदार यादीतील गोंधळ हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधारी पक्षांकडून ही तांत्रिक चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे देखील वाचा : बोटावरची शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन व्यक्ती केंद्राबाहेरच उभा..! पुण्यातील धायरीमध्ये धक्कादायक प्रकार
मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासन यावर उत्तर देणार का असा सवाल पुणेकर नागरिक विचारत आहेत. काही भागांमध्ये सीमारेषा बदल, वॉर्ड पुनर्रचना आणि जुन्या नोंदींच्या आधारे यादी तयार झाल्यामुळे अशा चुका झाल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक आणि पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे.
EVM मशीन बंद पडल्याचे प्रकार
प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.






