
Maharashtra Breaking News Today
02 Sep 2026 09:25 AM (IST)
Maharashtra Rain Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर ओसरल्याने पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून संबंधित भागांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वादळी पावसादरम्यान योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
02 Sep 2026 09:15 AM (IST)
PMRDA Pune International Exhibition: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर जागेवर आकार घेत असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ (PIECC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. हे प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी 'पीएमआरडीए'ने तातडीची पावले उचलली असून, त्या दृष्टीने महानगर आयुक्तांनी ‘लँड मॉनिटायझेशन सेल’ला पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
02 Sep 2026 09:03 AM (IST)
Raigad Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबातूनच राष्ट्रवादीला रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. आमदार अनिकेत तटकरे यांचे सासरे आणि सुनील तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे.
पोटफोडे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तटकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
02 Sep 2026 08:56 AM (IST)
Loose Edible Oil Ban:महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ वर्षाची स्थगिती दिली आहे. तेल व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असून राज्यभरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खाद्यतेलाची गुणवत्ता आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असली, तरी राज्यातील गरीब जनता आणि पारंपरिक व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन मध्यम मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यानुसार व्यापाऱ्यांना विद्यमान नियमांनुसार व्यवसायात आवश्यक ते बदल करण्यासाठी १ वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात आला आहे.
नेपाळमधील भीषण महापुरातील मृतांचा आकडा १,००० च्या पार गेला असून, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेला दबाव या आजच्या प्रमुख घडामोडी आहेत.
नेपाळ आणि तिबेट सीमेवरील हिमकडा कोसळल्याने आलेल्या महापुरातील मृतांचा आकडा १,००० पार गेला असून ४,००० पेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता आहेत.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने उत्तर भारत आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय शेअर बाजारात (सेन्सेक्स आणि निफ्टी) आज घसरणीसह नकारात्मक सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Brent Crude) किमती प्रति बॅरल ९७ डॉलरच्या जवळ पोहोचल्यामुळे महागाई आणि इंधन दरांवर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.