स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वतंत्रपणे लढविण्यासंदर्भातील महायुतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरच हाेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे या महायुतीच्या नेत्यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना पुन्हा एकदा हीच भुमिका मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे नेते बावनकुळे हे उपस्थित हाेते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खडकवासला मतदारसंघात जनसंवाद यात्रा पार पडली. यानिमित्ताने पुण्यातील राजकीय वातावरण आता तापू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकही महायुती एकत्रितपणे लढली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार का ? याविषयी उत्सुकता निर्माण झाली हाेती. यापुर्वी भाजपकडून स्वतंत्रपणे निवडणुक लढविण्याचे संकेत दिले जात हाेते. पुण्यात पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती करण्याविषयीचे अधिकार हे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे स्पष्ट केले. जर निवडणुक स्वतंत्रपणे लढली तर मित्र पक्षांवर टिका करताना मनभेद हाेणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
स्वबळावर नाहीच – बावनकुळे
बावनकुळे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भुमिकेला साथ देणारी भुमिका मांडली. राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर नव्हे, तर महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील. महायुतीमधील सर्व १३ पक्ष एकत्र येऊन या निवडणुका लढणार आहोत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती आली, तरी मनभेद होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असे ते म्हणाले.
एकत्र बसून निर्णय घेऊ – अजित पवार
उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी भुमिका मांडली. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती असते, असे त्यांनी नमूद केले. ‘‘ यापूर्वी आम्ही या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य स्थानिक नेतेमंडळींना दिले होते. त्याच पद्धतीने यावेळीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे नेते म्हणून मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपचे पुण्यात १२५ चे टार्गेट!
पुणे महापािलका निवडणुकीत १२५ नगरसेवक निवडुन आणण्याचे टार्गेट भाजपने निश्चित केले आहे. १६५ जागापैंकी १२५ जागांचे टार्गेट ठेवल्यामुळे पुण्यात भाजप स्वबळावर निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. भाजपने प्रभागनिहाय सर्व्हे सुरू केले असून, त्यामध्ये मागील २०१७ च्या निवडणुकीतील ४० जागा धोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. महापािलका निवडणुकीसाठी तयार केलेल्या नव्या प्रभाग रचनेनुसार ४१ प्रभाग आहेत. यापैकी ४० प्रभागांमधून प्रत्येकी चार आणि एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जातील. भाजपने प्रभागनिहाय उमेदवार यादी तयार करणे सुरू केले आहे.