महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे होते. असंही सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले तर आज 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 224 जागा मिळ्याल्या तर, महाविकास आघाडीला केवळ 51 जागांवर समाधान मानावे लागले. सकाळी पहिल्या फेऱीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. आणि ऐतिहासिक विजय आहे. ही निवडणूक लोकांनी त्यांच्या हातात घेतली होती. जनतेने मतांचा वर्षाव केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या सर्वांनी महायुतीवर प्रेम दाखवलं, या ऐतिहासिक विजयासाठी मी त्यांना दंडवत घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे काम केलं,जे निर्णय घेतले, ते अभूतपूर्व होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे थांबली होती. पण आम्ही ते सुरू केली, आम्ही कामाला, विकासाला प्राधान्य दिलं. या राज्याचा सर्वांगिण विकास आमच्या डोळ्यासोर होता.
अडिच वर्षात जी कामे थांबली होती. ती वेगाने सुरू केली. त्याचबरोबर कल्याणकारी योजना राबवल्या, लाडकी बहीण, युवा प्रशिक्षण योजना, सिलेंडर मोफत दिले, शेतकऱ्यांना 15 हजार कोटींचा मोबदला दिला. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या राज्याला पुढे न्यायचं सर्वांगिण विकास करायाचा हे आमचं ध्येय होतं. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या पाठिशी उभे राहिले, गेल्या दोन वर्षात लाखो कोटींचा निधी दिला.आमच्यावर अनेक आरोप झाले. त्यां आरोपाना आम्ही सामोरे गेलो. आमची नियत साफ होती.
आचारसंहिता लागण्यापूर्वीच आम्ही नोव्हेंबरचे लाडक्या बहिणीचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले होते. लोकांनी द्वेषाचे, आरोपांचे राजकारण धुडकावलं. एवढं करूनही नरेंद्र मोदी पंतप्रधनपदी बसले, आम्ही आरोपांना आरोपातून उत्तर नाही दिलं. कामातून उत्तर दिलं. सरकार पडणार म्हणायचे पण आम्ही काम करत राहिलो.
महाराष्ट्र्च्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. या विजयाने आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.