पलुस तालुक्यातील रस्ते पाण्याखाली
पलूस : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर तालुक्यातील नाले, चरी, विहिरी-ओढे ओसंडून वाहत होते. येळावी-आमणापूर, पलुस-धनगाव रस्त्यावर ओसंडून वाहणाऱ्या काळ्या ओढ्याच्या पाण्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत असल्याचे चित्र आहे. यामुळे नोकरदार, शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे.
गेले काही दिवस या मार्गावरील ओढ्याच्या पाईप बदलण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होते. मात्र, ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता फक्त पाईपलाईन बदलल्यामुळे पाणी साठायचे तसे रस्त्यावर साचून वाहतूक ठप्प होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि ठेकेदार यांनी या रस्त्याचा खेळखंडोबा करून टाकला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐन पेरणी, टोकणीच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात जाणे मुश्किल होऊन बसले आहे.
हेदेखील वाचा : Karjat News: पावसाला सुरुवात होत नाही तोच पुलाच्या कामाचे तीनतेरा; उल्हास नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद
या पाण्याच्या मार्गावर असणारे भराव लक्षात घेऊन त्या ठिकाणी काढलेल्या पाईप टाकल्यास या ठिकाणी रस्त्यावरून वाहणारे पाणी थांबू शकते. पण लक्षात कोण घेतो अशी स्थिती सध्या तरी आहे. रस्त्याच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यामुळे या वाहत्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते, याचा विचार संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे.
पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प
धनगाव शेरी भागातील नागरिकांना बोरजाईनगर मार्गे पलूस या तालुक्याच्या जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. मात्र, पावसाच्या पाण्याने वाहतूक ठप्प आहे. तसेच हा येळावी-आमणापूर रस्ता सांगलीला जाण्यासाठी एक सोयीचा रस्ता असूनही दुर्लक्षित आहे. आमणापूर गाव हे बँक आँफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेच्या येळावी शाखेकडे दत्तक आहे. तरी रस्त्याअभावी या बँकेशी व्यवहार करणे नागरिकांना मुश्किल होऊन बसले आहे.
हेदेखील वाचा : Nashik News : खेळता खेळता पाण्याच्या बादलीत गेला अन्…, एका क्षणाच्या निष्काळजीपणाने 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू