
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
27 Aug 2026 09:10 AM (IST)
सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर जनजागृती लघुपटाचे आणि ‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
27 Aug 2026 09:00 AM (IST)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार ७९३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर तब्बल १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर २४ ऑगस्ट रोजी एकूण ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले.
Marathi Breaking News Updates : तिबेट सीमेजवळील नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी हानी झाली. या महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि विविध प्रकल्पस्थळे वाहून गेल्याचे वृत्त असून, सुमारे १००० जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या आकडेवारीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या जलप्रलयात १३३ भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
स्थानिक वेळेनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. भोटेकोशी नदीचा उगम तिबेटच्या भागात होत असल्याने तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नेपाळ पोलिसांनी सांगितले. नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, तोपर्यंत अनेक गावे पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यात वाहून गेली. अद्याप १०० हुन अधिक मृतदेह हाती लागले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके कार्यरत आहेत.