मक्का–मदीना महामार्गावर सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) पहाटे झालेल्या भीषण अपघातात भारतीय उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस डिझेल टँकरला धडकली. धडकेनंतर बसला भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत किमान ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये हैदराबादमधील अनेक यात्रेकरूंचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंनी मक्कामध्ये धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर ते मदीनाकडे रवाना झाले होते. या दरम्यान मदीना रोडवरील एक अपघातप्रवण भागात बस टँकरला जोरात धडकली आणि काही क्षणांत ती जळून खाक झाली. घटनेचा व्हिडिओही समोर आला असून दृश्ये अतिशय भीषण आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी तातडीने बचाव पथकांना घटनास्थळी पाठवले असून मृतांची अधिकृत संख्या आणि ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भारत सरकारकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

