
Latur Political News: औसात 'उबाठा' सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर
Latur Political News: लातूर, शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या अस्तित्वावरच जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या औसा तालुक्यात भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. या पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हातातील ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ जवळ करण्याचे जवळपास निश्चित केले असून, हे कार्यकर्ते आज प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईत माजी आ. दिनकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
आज शेकडो नाराज कार्यकर्ते उबाठा सेनेच्या सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे दिले असून, उबाठा सेनेविरुद्ध औसा तालुक्यात रणशिंग फुंकले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील तिकीट वाटपावरुन नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांच्या नाराजीची परिणती सामूहिक राजीनाम्यात झाली आहे. ज्यांनी पक्षासाठी रक्त सांडलं, त्यांनाच डावलण्यात आल्यामुळे आम्ही उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करीत आहोत, असे सांगत या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्याच्या राजकीय मैदानात मोठीच खळबळ उडविली आहे.
हेही वाचा: Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल
औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा सेनेचा पाया असलेल्या १६ प्रमुख कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा देण्यात समावेश आहे. उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करून नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले औसा विधानसभेचे माजी आ. दिनकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, विधानसभा संघटक संदीपान शेळके, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उपतालुका समन्वयक महादेव साळुंखे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चिल्ले, बेलकुडच्या मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक अमित दिनकर माने आणि संतोष भोसले, शहर संघटक सचिन पवार, उपशहर प्रमुख किरण कदम, जि. प. चे माजी सभापती अमरसिंह भोसले, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, श्रीनिवास मदने आणि राजेंद्र माने हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज मुंबईच्या दिशने रवाना झाले. त्यांच्या समवेत औशाचे भाजपा आ. अभिमन्यू पवार हेही आहेत. त्यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सर्वांचे भाजपामध्ये स्वागत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीनंतरची राजकीय गणिते आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची झालेली कोंडी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली असून, वैयक्तिक कारणापेक्षा स्वाभिमान मोठा आहे. हेच या सामूहिक राजीनाम्यातून स्पष्ट होत आहे. यावरुन आता संघर्ष अटळ असल्याचे चित्र औसा तालुक्यात निर्माण झाले आहे.
औसा तालुक्यात जिल्हा परिषदेचे नऊ गट असूनही या नऊ गटांमध्ये उभे करण्यासाठी उबाठा सेनेकडे कार्यकर्ते उरलेले नाहीत. फक्त तीनच जागा उबाठा सेनेचे उमेदवार लढवत असून, उबाठा सेनेला तोंडी पाठिंबा दिलेल अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनाही औसा तालुक्यात सर्व ठिकाणी उमेदवार मिळालेले दिसत नाहीत. त्यांनी फक्त दोनच उमेदवार उभे केलेले आहेत. अर्थात उबाठा सेना आणि राष्ट्रवादी (अप) अधिकृत आघाडी अद्याप झाली नसून, ते फक्त एकत्रित आले आहेत. आता पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.