Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल
Latur ZP Panchayat Election: लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस, दूरदृष्टी असलेलं आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून प्रतिकात्मक, दिखाऊ उपक्रमांमुळे स्थानिक जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते व लातूर ग्रामीणचे माजी आ. धीरज देशमुख यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मांजरेश्वर देवस्थान येथे नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर मुरूड, अकोला व अंकोली येथे आयोजित कॉर्नर सभेत माजी आमदार धीरज देशमुख बोलत होते.
हे देखील वाचा: जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान
या सभेवेळी माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. ग्रामीण विकास म्हणजे फक्त उद्घाटनांची झुंबड नव्हे, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी कामं असली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी भाजप सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर खोटी आश्वासनं, दडपशाही आणि दिखाऊ विकासाचे मॉडेल राबवल्याची टीका केली. तसेच, मराठवाड्यातील रेल्वे बोगी कारखान्यासारख्या प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी असे अनेक मुद्दे उपस्थित करत भाजप आणि महायुतीवर घणाघाती जोरदार टीका केली.
हे देखील वाचा: Latur Municipal Corporation 2026: स्वीकृत सदस्यांच्या गणितात ट्विस्ट; लातूर मनपात स्वीकृत सदस्यांची संख्या ५ नाही, तर ७ असणार
काँग्रेस प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच वचनबद्ध
काँग्रेस भविष्यातही शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभी राहील. एकुर्गा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार दत्तात्रय टेकाळे आणि पंचायत समिती गणातील पूजा ढगे व गुरुनाथ गवळी यांच्या पाठीमागे मतदारांना भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी आमदार धीरज देशमुख यांनी केले. सभेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची रेलचेल आता राजकीय बदलांना कशी उपयोगी पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






