
वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
वाई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई औद्योगिक वसाहतीतील गणेशमूर्ती निर्मिती कारखान्याला (Ganesh Idol Factory Fire) मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत तयार गणेशमूर्ती, गौरीच्या मूर्ती, कच्चा माल, रंग, थिनर व अन्य साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ‘वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग’ तथा बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्यात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. रात्री सुमारे दहा ते साडेअकराच्या सुमारास आग लागली. रंग, थिनर व अन्य ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज, फलटण व सातारा येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. धुराचे लोट आणि आगीची तीव्रता यामुळे आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.
Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव
घटनास्थळी पोलिस, महावितरणचे कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक दाखल झाले होते. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत बचावकार्याला सहकार्य केले. गणेशोत्सवाच्या तोंडावरच आग लागल्याने कारखाना मालक, कामगार, मूर्ती विक्रेते आणि गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वाई MIDCमध्ये मूलभूत सुविधांचा मात्र बोजवारा उडाला आहे. भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र यांसारख्या अत्यावश्यक सुविधा MIDC परिसरात उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवर पथदिवे नसणे, स्पीड ब्रेकरचा अभाव, कामगार व नागरिकांसाठी बसथांबा नसणे, अशा अनेक समस्यांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकीकडे सुविधा नाहीत, तर दुसरीकडे अवैध धंद्यांना मात्र मोकळे रान? MIDCमधील चांदणी चौक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याची चर्चा असून, काही दुकानांमधून दारू व इतर नशायुक्त पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच अवैधरीत्या गॅस व पेट्रोल विक्री होत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. बेशिस्तपणे थाटलेल्या दुकानांमुळे वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत.
कोट्यवधींची उलाढाल, पण सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधा का नाहीत? एखादी दुर्घटना घडल्यानंतर बाहेरून अग्निशमन बंब आणि अन्य मदत मागविण्याची वेळ येत असेल, तर MIDCच्या आपत्कालीन व्यवस्थेचे हे मोठे अपयश मानायचे का, असा सवाल कामगारांकडून उपस्थित होत आहे.
या प्रश्नांवर उद्योजक संघटनेनेही केवळ किरकोळ विषयांवर चर्चा न करता ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. अग्निशमन केंद्र, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, पथदिवे, बसथांबा, सुरक्षित रस्ते आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी आता प्रशासनाच्या दारात निवेदने देण्यापलीकडे जाऊन उद्योग वाचवायचे असतील, कामगारांची सुरक्षितता जपायची असेल आणि MIDCचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल, तर सुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर उद्योजक संघटनेने आवाज उठविणे अपरिहार्य आहे.
KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश