मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान पूर्ण झाले असून या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र आहे. त्याचवेळी बहुतेक एक्झिट पोल्समध्ये महायुतीला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालाचा परिणाम केवळ राज्याच्या राजकारणावरच नाही तर, शेअर बाजार आणि देशाच्या आर्थिक धोरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा लागला आहे.
विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. त्यामुळे सर्वत्र चुरशीची लढत आहे. एक्झिट पोलचे आकडे दोघांमध्ये चुरशीची लढत दाखवत आहे. त्यामुळे सट्टेबाजाराचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. कोणाचे सरकार येणार? कोणता उमेदवार विजय होणार? यावर सट्टा लागला आहे.
छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेवर सट्टा लागला आहे. कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत आहे. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुकी देखील संभ्रमात आहे. कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे निघणार की शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठट निवडून येणार? याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत.
हे सुद्धा वाचा : कमळ खुलणार की, तुतारी वाजणार? ‘या’ मतदारसंघात लागल्या लाखो रुपयांच्या पैजा
फलौदी सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे. बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचे म्हटले आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विजयाचे आंतर कमी असणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून, 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.