भीमनगरवासियांची फसवणूक होऊ देऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश
पुणे : एरंडवणे येथील भीमनगर झोपडपट्टीचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीधारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका. गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी, अशा सूचना उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिल्या आहेत.
भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टीधारकांनी याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता. या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील व झोपडपट्टीधारकांचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही. याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ, असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टीधारकांना दिले.
हेदेखील वाचा : फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1.36 कोटींचा दंड वसूल; 23 हजार 480 जणांना ‘इथं’ बसला दणका
तसेच झोपडपट्टीधारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा. अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी, अशा सूचना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टीधारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीधारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ, प्रभु सूनगर, जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली.