'परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच'; पंकजा मुंडेंचा निर्धार(फोटो - सोशल मीडिया)
बीड : विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनांकडून मेळावे घेतले जातात. त्यात राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेली दसऱ्याच्या सिमोल्लंघनाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ही परंपरा श्रद्धा व निष्ठेने जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही परंपरा सुरू ठेवली आहे. श्वासात श्वास असेपर्यंत आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, असा निर्धार मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.
राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद आणि आपल्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी मी येत आहे, आपणही या, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. अठरापगड जातीसह गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांतील लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात हजेरी लावत असतो. सध्या पूर परिस्थितीने व अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण प्रत्यक्ष डोळ्याने ही परिस्थिती पाहिली आहे. मात्र, पूरग्रस्तांचा आधार होण्याचे काम हे सरकार निश्चित करणार आहे. भगवान भक्ती गडावर दरवर्षी होणाऱ्या परंपरेला आपण दसरा मेळावा म्हणत असलो तरी ही काही कोणती राजकीय सभा किंवा राजकीय-सामाजिक असे व्यासपीठ नाही.
हेदेखील वाचा : Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन
तसेच अतिवृष्टीच्या संकटात सुरुवातीपासून मी सर्वांना धीर देण्याचा व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः बांधावर जाऊन डोळ्यांनी सर्व परिस्थिती बघितली आहे. पूरग्रस्तांना धीर देण्याचे काम केले आहे. सरकारसोबतच संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना भगवान भक्तीगड देखील मदत करेल. यावेळी दसऱ्याच्या सणाला जे पुरणपोळी खाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी भगवान भक्त्ती गडावर येताना प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार चना डाळ, गुळ व गहू किंवा गव्हाचे पीठ घेऊन येण्याचे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले.