बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
तासगाव : कवठेएकंद गावात अलीकडेच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला असून, सुदाम बाळासो पावसे (वय ५३, रा. अंबाबाई मंदिराजवळ, कवठेएकंद) याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईदरम्यान राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव आणला गेल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी बेकायदा दारूकाम करणाऱ्या ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त केला. सापडलेल्या मालावर पाणी ओतून तो नष्ट करण्यात आला, तर शिंगटे जप्त करून पुढील तपासासाठी ठेवण्यात आली. रविवारी घडलेल्या भीषण स्फोटात आठ जण जखमी झाल्यानंतर या कारवायांना गती मिळाली. त्याच प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तहसीलदार व प्रशासनाने पुरवठा साखळी तपास सुरू केली आहे.
गावातील परिस्थिती गंभीर असून, अनेक ठिकाणी पोलिसांना अडवलेही गेले. काही दारू अड्ड्यांवर पोलिसांना प्रत्यक्ष अडथळा निर्माण करण्यात आला. मात्र, तरीही पोलिसांनी धाड टाकून कच्चा माल ताब्यात घेतला. प्रशासनाच्या कारवायांना ग्रामस्थ व काही मंडळांकडून विरोध होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कवठेएकंद व नागाव कवठे परिसरात दारू शोभेचे काम करणाऱ्या तब्बल ११३ मंडळांकडे कोणतेही परवाने नाहीत. कच्चा माल खरेदीपासून ते दारू साठवणे, बनवणे आणि उडवणे या सर्व प्रक्रिया बेकायदा पद्धतीने सुरू आहेत. दसऱ्याच्या दिवशी तब्बल तीन हजार किलो दारू उडवली जाते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रक्रियेतून प्रदूषणासोबतच भीषण अपघातांचा धोका कायम असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मते मागील काही दशकांत झालेल्या अशा स्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही ठोस उपाययोजना होत नसल्याने लोकांचा रोष वाढला आहे. राजकीय दबावामुळे कारवाई ठप्प होत असल्याचा आरोप जनतेतून केला जातो. आमदार व माजी खासदारांकडून या गंभीर विषयावर ठोस भूमिका दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घटनेनंतर जखमींची भेट घेतली असली तरी पुढील कारवाईबाबत ठोस निर्णय दिसून आलेला नाही. प्रशासनातील परस्परांतील समन्वयाच्या अभावामुळे यापुढेही अशा दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कवठेएकंदच्या दारू अड्ड्यांवर तातडीने कडक कारवाई करूनच मृत्यूच्या साखळीला आळा बसू शकतो.