मंत्री नरहरी झिरवाळ(फोटो-सोशल मीडिया)
Restrictions on artificial fruit ripening : कृत्रिमरित्या फळे व भाज्या पिकविण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर होऊ नये यासाठी तपासणी करण्यात यावी तसेच अवैध प्रकारांवर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. यासंदर्भात सहकार व पणन विभागाच्या अखत्यारीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या फळ व्यापाऱ्यांना फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी दिले.
मंत्रालयात सहकार, पणन आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे-पाटील, सहसचिव रा. को. धनावडे, सहआयुक्त मंगेश माने, तसेच सहकार व पणन विभागाच्या उपसचिव माधवी शिंदे उपस्थित होत्या. बेकायदेशीर रसायने किंवा गॅस वापरून फळे कृत्रिमरीत्या पिकविण्याचे प्रकार आढळल्यास अन्न सुरक्षा मानके कायदा (एफएसएसएआय) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान आंबा, केळी आणि इतर फळांचे एकूण १२८ नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १०४ नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत.
हेही वाचा : “तो थोडा जास्तच खेळत…” जुना मित्र गंभीरच्या बचावासाठी उतरला मैदानात! गरळ ओकणाऱ्यांना दिला सल्ला
२४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, बैठकीत विभागाकडून अशी माहिती देण्यात आली, अन्न सुरक्षा मानके नियम २०११ मधील नियमन 2.3.5 नुसार फळे कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कार्बाईड गॅसचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे. ऑगस्ट २०१६ मधील दुरुस्तीनुसार १०० पीपीएम तीव्रतेपर्यंत इथिलिन गॅसचा वापर करण्यास मर्यादित परवानगी देण्यात आली आहे. यावेळी विभागाचे सहायक आयुक्त महाले, कक्ष अधिकारी अजित जगताप उपस्थित होते.






