फोटो सौजन्य: iStock
१० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता खरवंडी येथील शेडमध्ये गळफास घेऊन थोरात यांनी आत्महत्या केली होती. त्यांचे चिरंजीव अरुण थोरात यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, थोरात यांच्या कागदपत्रांमध्ये आढळलेल्या एका पत्रामुळे प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली.
या पत्रात थोरात यांनी समता शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद, आर्थिक अनियमितता, व्यवहारांतील ताणतणाव आणि संस्थेतील काही व्यक्तींनी केल्याचा आरोप असलेल्या मानसिक छळाचा तपशील नमूद केला आहे. थोरात अध्यक्ष असताना त्यांनी आबासाहेब फाटके, भरत फाटके, जयवंत लिपाणे, मच्छिंद्र शिंदे, बन्सी म्हस्के आणि गोरक्षनाथ कुन्हे यांना संस्थेत सभासद केले होते. परंतु नंतर संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी या गटाने प्रयत्न केल्याचा उल्लेख पत्रात आहे.
थोरात यांनी संस्थेशी संबंधित वादात दिवाणी दावे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रिया आणि त्यानंतर झालेल्या समझोत्यामध्ये आपले सर्व दावे मागे घेतले होते. खर्च परत देण्याचे वचनही संबंधितांनी पाळले नसल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि सततच्या मानसिक छळामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचे अरुण थोरात यांनी नमूद केले आहे.
Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
फिर्यादीवरून पोलिसांनी जबाजी फाटके आणि आबासाहेब फाटके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिशिंगणापूर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
तपासादरम्यान या प्रकरणात आणखी अनेक पैलू उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही बाब एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
शिक्षण संस्थेत २६ ऐवजी ४८ सभासद दाखवून खोटे प्रोसिडिंग तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय, दहा लाख रुपये संबंधित अधिकाऱ्यांना देऊन चेंज रिपोर्ट मंजूर करून घेतल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे.






