
वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घोडबंदर बस डेपोत कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल दहा घंटागाड्या वर्षानुवर्षे वापराविना उभ्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या डेपोत या वाहनांवर धूळ साचलेली असून, नियमित वापराअभावी त्यांची अवस्था खराब होत असल्याचे दिसून येत आहे. (Mira Bhayandar News)
विशेष म्हणजे, या वाहनांवर परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या विशेष निधीतून खरेदी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून वाहने खरेदी केली जातात. मात्र, खरेदी केलेली वाहने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरविण्याऐवजी डेपोतच पडून राहिली असतील, तर या खर्चाचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घोडबंदर डेपोत उभ्या असलेल्या या घंटागाड्यांच्या कचरा साठवण्याच्या मागील भागात पावसाचे पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे. दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे वाहनांच्या लोखंडी भागांना गंज चढण्यास सुरुवात झाल्याचा दावा आहे. वाहनांचा नियमित वापर आणि देखभाल न झाल्यास त्यांच्या यांत्रिक तसेच बाह्य भागाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महापालिकेने जनतेच्या पैशातून खरेदी केलेली वाहने वापराअभावी खराब होत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे या घंटागाड्यांची अद्याप वाहन नोंदणी झालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. जर वाहनांची नोंदणीच पूर्ण झालेली नसेल, तर ती अधिकृतपणे रस्त्यावर कधी उतरविण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाहन खरेदी, नोंदणी, विमा, फिटनेस आणि प्रत्यक्ष वापरासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत नेमकी कोणती बाब प्रलंबित आहे, याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.
मीरा-भाईंदर शहरात कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. अनेक भागांमध्ये नियमित कचरा संकलनाची मागणी होत असताना दुसरीकडे कचरा वाहतुकीसाठी खरेदी केलेली वाहनेच वापराविना पडून असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेने या वाहनांसाठी निधी खर्च केला असेल, तर त्या वाहनांचा नियोजनबद्ध वापर करणे आणि त्यांची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, वर्षानुवर्षे वाहने डेपोत उभी राहिल्याने त्यांच्या उपयुक्त आयुष्यावरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घंटागाड्या नेमक्या कोणत्या वर्षी खरेदी करण्यात आल्या? त्यासाठी किती निधी खर्च झाला? विशेष निधीतून किती रक्कम उपलब्ध झाली? वाहनांची नोंदणी का झाली नाही? वाहने वापरात आणण्यासाठी कोणती प्रक्रिया प्रलंबित आहे? तसेच इतका काळ त्यांची देखभाल कोणत्या पद्धतीने करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित आहेत. विशेष निधीतून खरेदी करण्यात आल्याचे वाहनांवर नमूद असल्याने या खरेदीबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणीही होऊ शकते.
एकीकडे शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नवीन वाहनांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे उपलब्ध घंटागाड्या डेपोत धूळ खात पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ही वाहने नेमकी कधीपासून सेवेत दाखल होणार? त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार? आणि आतापर्यंत झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
महापालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करून वाहनांच्या खरेदीपासून आजपर्यंतचा खर्च, नोंदणीची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष वापराचे नियोजन स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा नागरिकांच्या पैशातून खरेदी केलेली वाहने वापराअभावी खराब होऊन अखेर भंगारात जाण्याची वेळ येऊ नये, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
Narali Purnima: उत्तनमध्ये नारळी पौर्णिमेची धूम; पारंपरिक वेशभूषा, सजवलेले कलश अन् उत्साहात मिरवणूक