
Mira Bhayndar: मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार
मिरा-भाईंदरमध्ये गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून शहरातील अनेक जुन्या इमारती आता पुनर्विकासाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. मात्र, पुनर्विकासासाठी विकासकांची निवड, करारातील अटी, परवानग्या, आर्थिक व्यवहार आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे अनेक प्रकल्प रखडतात. काही ठिकाणी पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे स्वतःच्या घराचा पुनर्विकास स्वतःच्या नियंत्रणाखाली करण्याचा पर्याय नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने मिरा रोड पूर्व येथील एस. के. स्टोन डोम येथे स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांचीही यावेळी उपस्थिती होती.
स्वयंपुनर्विकास पद्धतीमध्ये पुनर्विकासाची जबाबदारी आणि नियंत्रण संबंधित गृहनिर्माण संस्थेकडे राहते. त्यामुळे विकासकाविना प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा होतो. योग्य नियोजन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून रहिवाशांना त्यांच्या सध्याच्या घराच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
शिबिरात स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया, आवश्यक शासकीय परवानग्या, मंजुरी, आर्थिक नियोजन, बँकांकडून मिळणारे अर्थसहाय्य, बांधकाम प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींवर तज्ज्ञ तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आल्याने स्वयंपुनर्विकासाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरले.
दरम्यान, मुंबईत २० हून अधिक, ठाण्यात चार तर वसई-विरारमध्ये एका प्रकल्पासह विविध भागांत स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदरमध्येही शासनस्तरावर आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच इमारतींचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यास शहरातील अन्य जुन्या इमारतींसाठीही स्वयंपुनर्विकासाचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रयोगाकडे शहरातील जुन्या गृहनिर्माण संस्थांचे लक्ष लागले आहे.