देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता दिसून येते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असता, सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे पाऊस कधी पडणार? यासंदर्भात आयएमडीने हवामानबाबत अंदाज वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार, देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात मान्सून दाखल होईल. साधारणपणे 10 दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होऊ शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ विकसित होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची किंवा मान्सून वादळ येण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. या एप्रिलच्या मध्यात, सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. महाराष्ट्रातही मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदाजानुसार, IMD ने म्हटले आहे की, महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांनी उष्णतेपासून दिलासा
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, लवकरच देशातील उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. उत्तर-पश्चिम भारत आणि देशाच्या मध्य भागात तीन दिवसांनंतर उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उष्णतेची तीव्रता 30 वरून हळूहळू कमी होईल. इथून जवळ असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि आर्द्रतेमुळे देशाच्या वायव्य आणि मध्य भागात आणि पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.
पुढील तीन दिवस विदर्भात उकाडा राहणार आहे. तर मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचे संकेत आहेत. विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.