
तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
Mumbai FDA Action : सणासुदीच्या काळात अन्नभेसळीच्या घटना वाढण्याची शक्यता असताना मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांवर FDA कडून तपासणी केली जात आहे. या मोहिमेत मुंबईतील सात मोठ्या अन्न आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई अधिक तीव्र झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळल्यानंतर प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना निलंबित केला. रुग्ण, नातेवाईक आणि इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कुलाब्यातील प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये ग्राहकांच्या तक्रारीनंतर FDA पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणीत स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मूत्रालयाजवळ अन्नाची साठवणूक होत असल्याचं आढळलं. स्वयंपाकघर आणि भांडी धुण्याची जागाही अस्वच्छ असल्याचं तपासणीत समोर आलं.
तसंच, रेफ्रिजरेटरमध्ये मांसाहारी रक्ताचे अवशेष आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. कच्चे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे न ठेवता एकत्र साठवण्यात आल्याचंही तपासणीत आढळल्याचं FDA ने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, अन्न हाताळणाऱ्या 35 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांकडे आवश्यक अन्न सुरक्षा प्रशिक्षण नसल्याचंही तपासणीत समोर आलं.
याशिवाय चेंबूरमधील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या क्विक-कॉमर्स डिलिव्हरी सेंटरवरही कारवाई करण्यात आली. घाटकोपरमधील विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स आणि ए-1 जनरल अँड ड्राय फ्रूट्स, वरळीतील मिलन पंजाब तसेच मालाड पूर्वेतील सद्गुरू स्वीट्स यांच्याविरोधातही कारवाई झाली आहे.
अन्न सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून अन्न विक्री करणाऱ्या आस्थापनांचं आता काही खरं नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले