(Photo - X)
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात FIR दाखल केल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियन प्रकरणात अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह, सचिन वाझे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर नावांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय हेतूने चारित्र्यहनन केलं जात असल्याचा आरोप केला. “माझेही नाव आहे. तुमचेही येईल. दुरान्वयेही संबंध नाही. ओळख पाळख नाही. किती काळ सहन करत राहणार,” असं ते म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात राजकीय हेतू असल्याचा दावा केला. “नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. का म्हणून नाव घेतले जातंय. राजकीय हेतूने हे प्रेरित आहे. आम्ही गप्प होतो. फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जाऊ. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर X वरून भूमिका मांडली आहे. दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचं किंवा त्यांच्याशी आपली ओळख नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांपासून राजकीय हेतूने आणि चारित्र्यहननाच्या उद्देशाने आपलं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
तसंच, अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि CBI च्या कारवाईकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्य बदलू शकत नाही…’ आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं






