
दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड! पश्चिम रेल्वेचे 'ऑपरेशन दीप'; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम
Mumbai News: दिवाळीच्या सुट्टयांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘ऑपरेशन दीप’ अंतर्गत मुंबई विभागातील स्थानके आणि गाड्यांमध्ये तिकीट तपासणीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत विनातिकीट प्रवास करणारे, आरक्षित डब्यांत अनधिकृतपणे शिरणारे आणि आणि चुकीच्या श्रेणीतून प्रवास करणारे असतील. नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीट तपासणीचे आव्हानही वाढते. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे वैध तिकीट असलेल्या प्रवाशांची गैरसोय तपासणीचे नियोजन अधिक व्यापक केले आहे. स्थानकांवरील नियमित तपासणीबरोबरच अचानक तपासणी, सापळा कारवाई आणि विशेष पथकांच्या माध्यमातून गाड्यांमध्येही तपासणी केली जाणार आहे.
चार टप्प्यांमध्ये केली जाणार फुकट्यांवर कारवाई’ऑपरेशन दीप’मध्ये शोध, तपासणी, नियमांची अंमलबजावणी आणि दंडवसुली अशा चार टप्यांवर भर देण्यात आला आहे. ‘डी’ म्हणजे डिटेक्टिव्ह, यात विनातिकीट प्रवाशांचा शोध घेतला जाईल. ‘ई’ म्हणजे एक्झामिन, यात तिकिटे आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी होईल. दुसरे ‘ई’ म्हणजे इन्फोर्स, यात रेल्वे नियमांची अमलबजावणी केली जाईल. तर ‘पी’ म्हणजे पेनलाइज, या टप्यात नियम मोडणा-यांकडून दंड वसूल केला जाईल.
तिकीट तपासणीदरम्यान होणारे वाद, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि प्रवाशांशी होणारा संवाद अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रयोग सुरू केला आहे. मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना हे कॅमेरे आणि विशेष काळ्या रंगाची जॅकेट देण्यात आली आहेत. सुरुवातीला १५ बॉडी कॅमेरे आणि ३० जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून तपासणी प्रक्रियेवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून केवळ नियमित तपासणीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा वापर केला जात आहे. स्थानक तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड, फोर्ट्रेस चेक आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा त्यात समावेश आहे. मेल, एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्येही ही कारवाई केली जाते. रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार विनातिकीट प्रवासासाठी किमान ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट काढावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.