
फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! 'ग्रीन क्रॅकर्स'च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर
Mumbai News: फटाक्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. पूर्वी १४० डेसिबलहून अधिक आवाज करणारे फटाके आता बहुतांश वेळा १२५ डेसिबलच्या कायदेशीर मर्यादेत आले आहेत. मात्र, आवाजाची तीव्रता घटली असली, तरी फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी रसायनांचा गंभीर धोका अजूनही कायम असल्याचा इशारा ‘आवाज फाउंडेशन’ने दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
आवाज फाउंडेशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ८ सप्टेंबर रोजी वडाळा ट्रक टर्मिनस येथे २१ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेतली होती. त्यावेळी सर्वच फटाक्यांनी आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली होती; तर सर्वाधिक आवाज १४४.९ डेसिबल इतका नोंदवला गेला होता. त्यानंतर दरवर्षी नियमित चाचण्या आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आल्यामुळे फटाके उत्पादकांवर कमी आवाजाचे फटाके बनवण्यासाठी दबाव निर्माण झाला. परिणामी, फटाक्यांचा आवाज कायदेशीर मर्यादेत आणण्यात यश आले.
आवाज नियंत्रणात आल्यानंतर रासायनिक प्रदूषणाचा धोका अधिक ठळकपणे समोर आला. संस्थेने १० नोव्हेंबर २०१२ पासून मुंबईच्या बाजारपेठांतील फटाक्यांमधील रसायने आणि जड धातूंची तपासणी सुरू केली..गेल्या सुमारे १५ वर्षांच्या तपासणीत बंदी असलेल्या बेरियमसारख्या घातक रसायनांचा सर्रास वापर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बाजारात ‘ग्रीन क्रॅकर्स (हरित फटाके) म्हणून विकल्या जाणाऱ्या पाकिटांमध्येही ही विषारी रसायने आढळली असून, अनेक पाकिटांवरील क्यूआर कोड बनावट असल्याचेही संस्थेच्या निदर्शनास आले आहे.
केवळ आवाज कमी असलेला फटाका म्हणजे तो पर्यावरणासाठी सुरक्षित आहे असे नाही, असा इशारा संस्थेने दिला आहे.त्यामुळे फटाके खरेदी करताना पाकिटावरील घटकांची माहिती नीट वाचावी, क्यूआर कोड अधिकृत आहे का याची तपासणी करावी आणि ते खरेच ‘ग्रीन क्रॅकर्स’ आहेत का, याची खातरजमा करूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषणावर मात केल्यानंतर आता रासायनिक प्रदूषण रोखण्याचे नवे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.
Ans: ग्रीन क्रॅकर्स म्हणजे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करणारे फटाके. यामध्ये काही हानिकारक घटकांचे प्रमाण कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
Ans: नाही. ग्रीन क्रॅकर्समुळेही वायू आणि ध्वनी प्रदूषण होऊ शकते. मात्र, योग्य मानकांनुसार तयार केलेल्या ग्रीन क्रॅकर्समुळे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
Ans: काही फटाक्यांमध्ये बेरियम, शिसे, अँटिमनी आणि इतर धातूंची संयुगे वापरली जाऊ शकतात. काही रसायनांचा वापर नियमांनुसार प्रतिबंधित किंवा मर्यादित आहे.