
राज्यात मिथेनॉल माफियांवर छापेमारी! ९८८ परवानाधारकांची तपासणी फास्ट ट्रॅकवर; ५० संस्था बंद
पुण्यातील विषारी दारूकांडानंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर मिथेनॉलच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर मोठी मोहीम हाती घेतली असून परवानाधारक संस्थांची तपासणी युद्धपातळीवर सुरू केली आहे. राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानाधारक संस्थांपैकी २२६ संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून नियमभंग आढळलेल्या ५१ संस्था बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित तपासण्या पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. अवैध औषध व्यवसाय, विषारी द्रव्यांचा गैरवापर आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
‘प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार’; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम
पुणे विषारी दारू प्रकरणात मिथेनॉल पुरवठ्याशी संबंधित भिवंडीतील ‘रेक्स इंटरनॅशनल’ या संस्थेवरही प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. संस्थेचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ५ हजार २२९ किलो संशयित मिथेनॉलचा सुमारे ३.६० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गाळा सील करण्यात आला असून मालकांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिथेनॉल हे विषारी द्रव्य असल्याने त्याच्या विक्री, साठवणूक आणि वितरणावर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान साठा, नोंदवही, वितरण व्यवस्था आणि परवान्याच्या अटींची पडताळणी केली जात आहे.
66 पुण्यातील विषारी दारूकांड ही केवळ एक घटना नसून संपूर्ण यंत्रणेसाठी इशारा आहे. मिथेनॉलच्या साठवणूक, विक्री आणि वितरणात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीला माफी दिली जाणार नाही. राज्यातील सर्व परवानाधारक संस्थांची तपासणी निश्चित कालावधीत पूर्ण करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मांडले आहे.
राज्यातील ९८८ मिथेनॉल परवानाधारक संस्थांची तपासणी सुरू
२२६ तपासण्या पूर्ण ५१ संस्था बंद
नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
संशयित मिथेनॉल साठ्यांवर विशेष लक्ष
विषारी द्रव्ये कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई