Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार
Karjat Panchayat Samiti: कर्जत पंचायत निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले, मात्र अद्याप सभापती पदाची निवडणूक कधी होणार? हे सरकारच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले नाही. दुसरीकडे कर्जत पंचायत समिती सभापतीपद ही नागरिकांचा मागास प्रवर्ग असे राखीव असताना बहुमत असलेली कर्जत परिवर्तन विकास आघाडी महिला सदस्यांना सभापती करण्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील सर्वसाधारण असताना पुरुष सदस्य यांच्या ऐवजी महिला सदस्यांना देण्याचा घाट आघाडीकडून घाट घातला जात आहे.
दरम्यान, हा नवीन पायंडा पडण्याची शक्यता असून पुरुष सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. इच्छुक पुरूष सदस्यांच्या मनात धडकी भरली असून पुरुषांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न कर्जत परिवर्तन आघाडीचे नेते करीत असल्याने त्या निर्णयाचे मोठे दुष्परिणाम आघाडीला भविष्य काळात भोगावे लागू शकतात.
पंचायत समितीत १२ सदस्यांमध्ये परिवर्तन आघाडीचे १०, महायुतीचे २ सदस्य निवडून आले. पहिली अडीच वर्षे सभापती पद हे ना.मा.प. राखीव आहे. परिवर्तन आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा उमेदवार सभापती होणार हे देखील नक्की आहे. महिला आरक्षण नसेल तर शक्यतो महिला सदस्यांचा त्या पदासाठी विचार होत नाही, हा राजकारणात एक पायंडा दिसतो. त्यामुळे विजयी उमेदवार भगवान चंचे, महेश खारीक आणि नितीन धुळेंची चर्चा आहे.
नमिता घारे यांच्याकडे कुणबी जातीचे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी राखीव असलेल्या सभापती पदावर विराजमान होऊ शकतात. पण राजकारणात पुरुषांसाठी असलेल्या जागेवर महिला सदस्यांना संधी देऊन पदाधिकारी बनवले जात नाही, असा अलिखित नियम असताना नमिता घारेना कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते केल्याने पुरुष सदस्य नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे आता सभापती पदावर पुरुष सदस्याला बसवण्याऐवजी महिला सदस्या नमिता घारे यांना सभापती केले जाईल असे सुतोवाच आघाडी मधील कार्यकर्ते करीत आहेत. त्यांचा थेट परिणाम राजकीय पटलावर पडू शकतो आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये दावेदार असलेले पुरुष सदस्य नाराज होऊ शकतात. सभापती पदांसाठी एका विशिष्ट जातीच्या सदस्यांना सभापती मिळू नये म्हणून महिला सदस्यांना सभापतीचा प्रयत्न आहे.






