मुंबईत बेस्ट बसचा अपघात, रस्ता खचून बस गेली 5 फूट खोल खड्ड्यात (फोटो सौजन्य-X)
BEST Bus Accident News In Marathi: गेल्या दोन दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरुच आहे.अशातच मुंबईत सोमवारी (16 जून) सकाळपासनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मुंबईतल्या गिरगाव परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला असून बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. हा खड्डा पावसामुळे झाला आहे. बसचा मागचा टायर या रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात अडकला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. बस रिकामी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव बेस्ट अपघाताची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्ताखाली खोदकाम सुरु असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या काही भाग खचला होता. याचा खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला. रस्त्याला आधार देण्यासाठी सिमेंट रस्ते बांधण्यात आले. पण टेक्निकली गोष्टी घाईघाईत झाल्यात. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराने घाईघाईने काम पूर्ण केले आणि काम निकृष्ट दर्जाचे केले. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.
दरम्यान, हा रहदारीचा रस्ता असून सोमवारी सकाळी चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ये – जा असते. त्यामुळे बेस्ट वाहतूक देखील या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान मुंबई मेट्रो लाईन ३ वर काम सुरू आहे. आज काही ठिकाणी अपघात झाला. वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळेच हे परिस्थिती उद्भवली आहे, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर, या रस्त्यावरून जात असताना अचानक मागचे टायर खड्ड्यामध्ये अडकले. बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती बस चालकाने दिली आहे. आता ही खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर भागात एका डंपर चालकाने 3 जणांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवर शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. संतप्त जमावाने या मार्गावर काही काळ ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला होता. जमावाकडून डंपरच्या काचा फोडून तोडफोड देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले.