शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांना बंडखोरीसाठी जबाबदार धरले (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची विधाने देखील चर्चेत आहेत. सध्या राजकीय वर्तुळामध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे विधान जोरदार चर्चेत आले आहे. मागील तीन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्य मोठे बंड झाले. भरत गोगावले यांच्या धक्कादायक विधानामुळे पुन्हा एकदा या बंडाच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांना पक्षांतर्गत फुटीचा मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह पक्षांमध्ये बंड करुन गुवाहटी गाठली. यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करुन राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांचे हे राजकीय बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरले आहे. याबाबत आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी धक्कादायक विधान केले आहे. शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचे मोठे विधान भरत गोगावले यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा बंडखोरीचा इतिहास उकरुन काढला आहे. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही
पुढे ते म्हणाले की, आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते. बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही, अशी नाराजी भरत गोगावले यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना पक्षफुटीला जबाबदार धरले आहे. भरत गोगावले म्हणाले की, महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एन्ट्री नाही. आता ज्या एन्ट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असा टोला देखील शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.