फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य, नवी मुंबई:- दिव्यातील विकासकाकडे खंडणी मागितल्याप्रकारणी चौघा जणांवर रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. विकासक कन्हैयासिंग कुशवाह यांनी बांधलेल्या घणसोली डी मार्ट समोर जिजामाता नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट अनधिकृत असल्याचे सांगून कुशवाह यांच्याकडून पैसे मागितले तसेच पैसे ना दिल्यास त्या इमारतीवर कारवाई करण्याची धमकी दिल्याने विकासक कुशवाह यांनी रबाळे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दिव्यातील रहिवासी असणारे विकासाक कन्हैयासिंग कुशवाह यांनी तीन वर्षांपूर्वी, घनसोली डी मार्ट समोरील जिजामाता नगर मध्ये महालक्ष्मी बिल्डिंग बनवली होती. ही बिल्डिंग बनवत असताना त्यांची ओळख सचिन कदम यांच्याशी झाली. सचिन कदम यांनी स्वतःची ओळख पत्रकार म्हणून सांगितली. दोघांमध्ये ओळख वाढल्यावर सचिन कदमचे कुशवाह यांच्या कार्यालयात येणे जाणे वाढले. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारी महिला रेखा शिंदे याच्याशी ओळख झाली. नंतर सचिन याने सुरेश मंगरूळकर हे देखील पत्रकार असल्याचे सांगत त्यांची ओळख कुशवाह यांच्याशी करून दिली.
काही दिवसांनी सचिन कदम याला कौटुंबिक कारणास्तव घराबाहेर काढल्यावर, माणुसकीच्या नात्याने कुशवाह यांनी सचिनला महालक्ष्मी बिल्डिंगमध्ये भाड्याने रूम रहावयास दिली. सचिन याने फक्त एका महिन्याचे भाडे दिले, मात्र इतर महिन्यांचे भाडे न दिल्याने कुशवाह यांनी सचिनला रूम खाली करण्यास सांगितले. याचा राग मनात धरून सचिन कदम हा कुशवाह यांना तुमची बिल्डिंग अनधिकृत आहे. याबाबत मनपा व सिडकोमध्ये तक्रार करून ती इमारत पाडायला भाग पाडण्याची धमकी देऊ लागला. व कुशवाह यांच्या विरोधात मनपा मुख्यालय समोर उपोषणाला बसला.
दरम्यान सुरेश मंगरूळकर यांनी विकास कुशवाह यांना फोन केला, व सचिन कदम उपोषणाला बसला आहे. त्याला जे पाहिजे ते देऊन टाका. असे सांगितले कुशवाह यांनी उपोषण स्थळी सचिन यांची भेट घेण्यासाठी गेले असता, मंगरूळकर यांनी सांगितले की उपोषण सोडायचे असेल तर रेखाची मुलगी अथवा ठाकूर यांच्या नावावर एक फ्लॅट करून द्या. तसेच उपोषण सोडण्यासाठी भगवान सिंह ठाकुर यांनी स्वतःसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली असता, कुशवाह यांनी ठाकूर यांना पन्नास हजार रुपयांचा धनादेश व ५ हजार रुपये रोख दिले. तरी देखील वारंवार बिल्डिंग तोडण्याची धमकी व फ्लॅटची मागणी होत असल्याने, कुशवाह यांनी एक फ्लॅटचे बक्षीस पत्र केले. मात्र सचिन कदम यांनी रेखा शिंदे यांच्या फोनवरून बक्षीस पत्र ऐवजी सेल एग्रीमेंट करायला सांगितले. या सगळ्याला वैतागून विकासक कन्हैयासिंग कुशवाह यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन सचिन मोहन कदम, वय ४५ वर्षे, राहणार कोपरखैरणे, सुरेश नारायण मंगरूळकर, वय ६२ वर्ष, राहणार ऐरोली, भगवानसिंह गोविंदसिंह ठाकुर, वय ६४ वर्ष, राहणार दिघा गाव, रेखा सुभाष शिंदे, वय ४५ वर्षे, राहणार घनसोली, या चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.