केट मिडलटन यांचा स्वतंत्र दौरा; डॉक्टर, परिचारिका आणि नवमातांशी संवाद
मुंबई : माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यसेवेतील भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी बुधवारी परळ येथील नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाला स्वतंत्र भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तसेच नवजात बालकांच्या संगोपनासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांची माहिती घेतली. १९२६ मध्ये स्थापन झालेले वाडिया प्रसूतिगृह यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रिन्सेस ऑफ वेल्स यांची भेट रुग्णालयासाठी विशेष महत्त्वाची ठरली.(Wadia Maternity Hospital)
राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता
प्रिन्स विल्यम यांच्यापासून वेगळा कार्यक्रम करत केट यांनी या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी प्रसूती आणि नवजात बालकांच्या उपचार विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. माता आणि बालकांच्या आरोग्याबरोबरच प्रसूतीनंतर कुटुंबांना मिळणारा आधार, बालकांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि उपचारपद्धती याविषयी त्यांनी जाणून घेतले. या वेळी भारतातील मातामृत्यूदरात झालेल्या सुधारणेचीही माहिती त्यांना देण्यात आली.
ग्रामीण आणि दुर्गम भागांतील गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूतीसाठी आणण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी घेतली. प्रसूतीपूर्व तपासण्या, रुग्णालयातील प्रसूती आणि बालकांचे लसीकरण यासाठी महिलांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही कुटुंबीयांशीही केट यांनी संवाद साधला. नवजात बालकांच्या गंभीर आजारांमुळे पालकांना येणारा मानसिक ताण आणि अशा वेळी रुग्णालयाकडून मिळणारा आधार याबाबत त्यांनी चर्चा केली.
वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिन्नी बोधनवाला यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स, लंडनच्या संरक्षक सदस्य असलेल्या प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी आमच्या रुग्णालयाला भेटीसाठी निवडणे ही संपूर्ण रुग्णालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आमचे प्रसूतिगृह शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना या सन्मानामुळे या वर्षाचे महत्त्व आणखी वाढले आहे. रुग्णसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी ही भेट प्रोत्साहन देणारी आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स यांच्याकडून मिळालेली प्रशंसा आणि सन्मान यामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच प्रोत्साहन मिळेल. असं डॉ. बोधनवला म्हणाल्या.
Ans: ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी परळ येथील नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाला भेट दिली.
Ans: त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
Ans: नवरोजी वाडिया प्रसूतिगृहाची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, यंदा रुग्णालय शताब्दी वर्ष साजरे करत आहे.






